कर्नाटक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१ मे २४ बुधवार
निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलतांना कधी कधी नेत्यांचा तोल ढासळतो आणि ते नको असलेले विधान बोलून बसतात.कर्नाटकमध्ये एका काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू झाला तर काय होईल ? असे विधान या नेत्याने केले आहे.या विधानानंतर कर्नाटक भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे.काँग्रेस नेते पंतप्रधान मोदींच्या मरणाची वाट पाहत आहेत असाही आरोप भाजपाने केला आहे.बेळगावमधील काँग्रेसचे आमदार राजू केज यांनी भाजपा आणि जे तरूण मोदींचा जयघोष करतात त्यांच्यावर टीका करतांना पंतप्रधान मोदींच्या मृत्यूबाबत विधान केले असून ते म्हणाले,मी पदवीधर असून मला बुद्धी आहे.मी निरक्षर नाही.मी देखील देश चालवू शकतो इतका आत्मविश्वास माझ्यात आहे.जर उद्या मोदींचा मृत्यू झाला तर कुणीच पंतप्रधान होणार नाही का ? या देशात १४० कोटींची लोकसंख्या आहे.एवढ्या लोकांमध्ये पंतप्रधान होऊ शकणारा एकही व्यक्ती नाही का ? अशी भूमिका विशद केली आहे.
आमदार राजू केज यांच्या या टीकेनंतर भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.भाजपाने आपल्या पक्षाच्या एक्स अकाऊंटवर राजू केज यांचा व्हिडीओ शेअर करून काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या मरणाची वाट पाहत आहेत ? अशी टीका केली आहे.राजू केज यांनी पहिल्यांदाच वादग्रस्त विधान केले आहे असे नाही तर याआधीही त्यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरली होती.काही दिवसांपूर्वी राजू केज यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जीवनशैलीवर टीका केली होती.पंतप्रधान मोदी हे महागड्या विमानातून प्रवास करतात तर त्यांचे कपडे चार लाख रुपयांचे असतात असा आरोप त्यांनी केला होता.विशेष म्हणजे राहू केज हे भाजपामध्येच होते.२०१९ साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.भाजपातून बाहेर पडण्याआधी राजू यांनी माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यावर वर्णद्वेषी टीका केली होती. काही लोक (कुमारस्वामी) पंतप्रधान मोदींवर टीका करतात.मोदी वारंवार कपडे बदलतात असे ते म्हणतात.अरे पण मोदी छान दिसतात त्यामुळे ते वारंवार कपडे बदलत असतील.पण तुम्ही (एचडी कुमारस्वामी) दिवसातून १०० वेळा आंघोळ केली तरी रेड्याप्रमाणेच दिसता अशी टीका राजू केज यांनी केल्याचे तेव्हा एएनआयने आपल्या बातमीत म्हटले होते.