रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ मे २४ शुक्रवार
विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्यामुळे एका दलित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काल दि.२ मे गुरुवार रोजी कोपर्डी येथे घडली आहे.सदरहू या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोपर्डी येथे भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने बुधवारी रात्री तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान गावाजवळच हरणवस्ती येथे राहणारा तरुण नितीन शिंदे हा तमाशा सुरू असतांना व्यासपीठाजवळ नाचत होता व त्यास हरकत घेऊन काही जणांनी त्याला मारहाण केली त्यामुळे तमाशात गोंधळ उडाला.काही जणांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले परंतु गोंधळामुळे तमाशा बंद पडला त्यानंतर शिंदे घरी जात असतांना त्याला विवस्त्र करत मारहाण झाली व त्याचा मोबाइलही काढून घेतला. सकाळी त्याने घरी निरोप पाठवला व त्याचे नातलग कपडे घेऊन आले व त्याला घरी नेले.काल दि.२ मे गुरुवार रोजी दुपारी नितीनने घरातच आत्महत्या केली.रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.नितीन शिंदे याच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत गावातील काही जणांची नावे लिहिली आहेत त्याआधारे गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले आहे.