यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ मे २४ शुक्रवार
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील मारुळ-हंबर्डी या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासुन खूपच दयनीय अवस्था झालेली होती व त्यामुळे वाहनधारक,शालेय विद्यार्थी,महिला,वयोवृद्ध व शेतकरी या रस्त्याच्या दुर्दशेमुळे मोठ्या प्रमाणावर त्रस्त होते. सदरहू मारुळ ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच असद जावेद सैय्यद व त्यांच्या सहकार्यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व्हावे याकरीता यावल रावेर मतदार संघाचे आ.शिरीष चौधरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने सदरील रस्त्याचे नुकतेच नवीन डांबरीकरण करण्यात आले होते.या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाल्यामुळे शालेय विद्यार्थी,शेतकरी,महिला,वयोवृद्ध यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होऊन होणारा त्रास कमी झाला होता परिणामी त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते.
दरम्यान एक-दोन दिवसाआधी रात्रीच्या वेळेस अंधाराचा गैरफायदा घेऊन कुणीतरी अज्ञात माथेफिरूने नवीन अल्पसंख्यांक समाज बांधवांच्या कब्रस्ताना जवळ सदरील नवीन डांबरीकरण रस्त्यावर जाणून बुजून रस्त्यात दोन ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदल्यामुळे रहदारीस व सर्वसामान्य नागरिक व शेतक-्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच बुद्धनगरी,अरबी मदरसा येथील नागरिक,शालेय विद्यार्थी,अंगणवाडीचे लहान चिमुकले बालके,महिला,वयोवृद्धांना,शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.सदरहू दि.२ मे २४ रोजी मारूळ ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य हे मोटर सायकलीने हंबर्डीवरून मारुळ येथे येत असतांना रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यामध्ये त्यांच्या मोटरसायकलचा अपघात होऊन त्यांच्या उजव्या पायाला मोठी दुखापत झाले असून ते सुदैवाने थोडक्यात बचावले तर दुसऱ्या दिवशी एका महिलेचा पाय खड्ड्यात पडल्यामुळे त्यांच्याही पायास दुखापत झालेले आहे.दरम्यान मारुळ-हंबर्डी या रस्त्याने नियमित रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर रहदारी सुरू असते त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरील माथेफिरूने केलेल्या घाणेरड्या कृत्याची मोठी किंमत भविष्यात सर्वसामान्य माणसांना मोजावी लागेल अशी शंका व्यक्त केली जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये त्या अज्ञात माथेफिरू विषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.परिणामी आज दि.३ मे शुक्रवार रोजी सकाळी संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंच असद सैय्यद व कार्यकारिणी ग्रामविकास अधिकारी आर.टी. बाविस्कर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जावेद अली सैय्यद यांची भेट घेऊन आपल्याला होणारा त्रासाबद्दल कैफियत मांडून भविष्यात अपघात होऊ नये व आमचा दैनंदिन त्रास दूर व्हावा अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.सदरचा डांबरी रस्ता हा शासकीय मालमत्ता असून त्या शासकीय मालमत्तेची एका अज्ञात माथेफिरू इसमाने नासधुस करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून शासनाचा निधी वाया घालवुन तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या अज्ञात माथेफिरू इसमाविरुद्ध सार्वजनिक बांधकाम यावल विभाग,पोलीस प्रशासन, तहसीलदार,गटविकास अधिकारी,सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मारुळ हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तसेच अज्ञात माथेफिरू इसमाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.