सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ मे २४ शनिवार
अलिकडे राजकारणात जाती-धर्माचा प्रभाव इतका वाढला आहे की त्यात देशाची अर्थव्यवस्था,वाढती बेरोजगारी,दररोजचे जगण्याचे प्रश्न बाजूला पाडले जात आहेत.जाती-धर्माचा राजकारणावरील पगडा असाच वाढला तर भारत देशाचा पाकिस्तान होण्यास विलंब लागणार नाही. रोजगाराचा प्रश्न वरचेवर गंभीर होत असून तो गांभीर्याने न पाहिल्यास आगामी संपूर्ण दशक हिंसक बनेल असा इशारा ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी दिला आहे.सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना समर्थन देण्यासाठी फुटाणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले,मी सुरुवातीपासून काँग्रेस विचारांचा असलो तरी कवी म्हणून काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांतील विसंगती शोधत असतो.सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आहेत.कवी,लेखकांनी सत्तेच्या बाजूने नाही तर सत्तेच्या विरोधात उभे राहायला हवे.व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत.
लोकसभा निवडणूक पात्र खासदार निवडून देण्यासाठी असते.देशाची अर्थव्यवस्था,आंतरराष्ट्रीय राजकारण,विकासाच्या प्रश्नांची जाण असणारे खासदार निवडून गेले पाहिजेत.प्रणिती शिंदे यांच्यात ही पात्रता असल्याचा दावा त्यांनी केला आहे.राजकारणात जाती-धर्माचा वाढलेला पगडा पाहता परमेश्वरालाच पश्चाताप वाटावा इतकी भयाण स्थिती पाहायला मिळते.धर्माचा संबंध नैतिकतेशी आहे परंतु ही नैतिकता राजकारणात धर्माचा,जातींचा प्रभाव पाहता कोठेही दिसत नाही.धर्मातून माणसांना माणसे जोडली जातात परंतु सध्या माणसांना माणसांपासून तोडण्यासाठी धर्म-जातींचा दुरूपयोग होत आहे अशी खंत फुटाणे यांनी व्यक्त केली.यावेळी उद्योजक दत्ता सुरवसे,मसाप सोलापूर शाखेचे पद्माकर कुलकर्णी आदी उपस्थित होते.