रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील जिंकतील की रक्षा पुन्हा बाजी मारतील ? मतदारसंघातील ग्राऊंड रिपोर्ट
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ मे २४ मंगळवार
रावेर मतदारसंघात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविरोधात ‘राष्ट्रवादी’तर्फे शरद पवार यांनी नवख्या परंतु सामान्य कुटुंबातून यशस्वी उद्योजक म्हणून मान्यता पावलेल्या श्रीराम पाटील यांना मैदानात उतरविल्यानंतर निवडणूक चुरशीची बनली आहे.लेवा पाटीदार समाजाचे उमेदवार निवडून येणाऱ्या या मतदारसंघातून श्रीराम पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीने ‘मराठा कार्ड’ खेळले आहे.रक्षा खडसे यांच्याकडून दहा वर्षांचा हिशेब मागतानाच ‘श्रीराम’ नावाचा उल्लेख करीत आता हाच राम तुमचा विकास करेल अशी साद मतदारांना घातली जात आहे तर महायुतीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभर केलेल्या विकासकामांचा जप करीत राष्ट्रीय मुद्देच रेटले जात आहेत.एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याची घोषणा करून स्नुषा रक्षा खडसे यांच्या प्रचारात उडी घेतली आहे व या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा रावेरमधील ‘पॉवर गेम’ यशस्वी होणार काय ? अशी चर्चा चर्चिली जात आहे.
सन २०१४ व २०१९ अशा दोन वेळा रावेरचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली आहे.सदरहू या मतदारसंघात ‘लेवा’पाठोपाठ मराठा समाजाचे प्राबल्य आहे त्यामुळे ‘मविआ’ने आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाची भाजपविरोधातील नाराजी ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न चालवला आहे.शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची ‘खडसे’ कुटुंबावर असलेली नाराजी आणि त्यातच संतोष चौधरी यांचे बंड थंड झाल्याने श्रीराम पाटील जोशाने कामाला लागले आहेत.रक्षा यांच्या ‘खडसे’ नावामुळे सुरू झालेली भाजपमधील अंतर्गत धुसफूस मोडून काढतानाच शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मदत मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार होती परंतु ऐन वेळी सासरे एकनाथ खडसे यांनी पवार गटाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये घरवापसी करण्याची घोषणा केल्याने रक्षा खडसे यांची ताकद निश्चित वाढली आहे.भाजपचे दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांची नाराजीही दूर झाली आहे.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची मनधरणी केल्याने खडसेंचा उत्साह वाढणेही साहजिकच आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील तीन पक्ष बलदून आल्याचे आरोप करून भाजपने रान उठवले आहेत.स्थानिक मुद्द्यांपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली जात आहेत. दुसरीकडे श्रीराम पाटील यांनी केळी उत्पादकांच्या समस्या,रेल्वेचे प्रश्न तसेच उद्योगांअभावी रावेर मतदारसंघातील बेरोजगारीच्या प्रश्नाला हात घातला आहे.प्रचारात उतरलेल्या एकनाथ खडसेंवर घराणेशाहीचा ठपका ठेवत त्यांना लक्ष्य केले जात आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीतर्फे संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.संजय ब्राह्मणे इंजिनीअर असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभाही झालेल्या आहेत त्यामुळे रक्षा खडसे,श्रीराम पाटील यांच्यासोबत संजय ब्राह्मणेही निवडणुकीच्या रिंगणात गेम चेंजरची भूमिका प्रभावी ठरणार आहे.यात दोन टर्म खासदारकीचा अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदींची संभाव्य लाट, सासरे एकनाथ खडसे यांची मिळालेली साथ,गुजर समाजाची लेक असल्याने समाजाचे मतदान तसेच भाजपच्या बूथरचनेची ताकद यामुळे रक्षा खडसे यांची जमेची बाजू आहे.तर दहा वर्षे खासदार राहूनही सिंचन व केळीचे प्रश्न प्रलंबित,खडसे कटुंबावर असलेली पक्षांतर्गत नाराजी, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मदतीबाबत साशंकता व निवडक पदाधिकाऱ्यांशी संपर्क असल्याचे होत असलेले आरोप या बाबी रक्षा खडसे यांच्या साठी त्रासदायक ठरू पाहत आहेत.दरम्यान नवखे असल्याने कोरी पाटी म्हणून फायदा,कृषी क्षेत्रातील यशस्वी उद्योजक,थेट शेतकऱ्यांशी संपर्क,संतोष चौधरींची मिळालेली साथ,खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांची प्रचारात सोबत तसेच काँग्रेस व ठाकरे गटाची प्रामाणिक साथ या श्रीराम पाटील यांच्या करिता जमेच्या बाजू आहेत.तर नवखा उमेदवार व तुतारीवाला माणूस हे चिन्ह घराघरात पोहचविण्याचे आव्हान,ऐन वेळी पवार गटात आल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जवळीकीचा अभाव,सक्षम बूथरचना यंत्रणेचा अभाव,प्रतिस्पर्धी गोटात गेलेले एकनाथ खडसे या श्रीराम पाटील यांच्यासाठी चिंतेच्या बाबी ठरू शकतात.यात केळी प्रमुख पीक असूनही प्रक्रिया उद्योग नाही,रोजगार संधींचा अभाव,दळणवळणाची मर्यादित साधने,सिंचनाचे अनेक प्रकल्प रखडले तसेच करोना काळापासून किसान रेल्वे रेक बंद हे या प्रचारातील कळीचे मुद्दे ठरू शकतात.