दि.७ मे २४ मंगळवार
रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटलांच्या विजयासाठी दुसऱ्या एका श्रीरामने अनोखा संकल्प केला असून श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेत ते विजयी गुलाल उधळेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही ! असा संकल्प या श्रीरामने केला आहे.एखाद्या व्यक्तीवर असलेली निष्ठा आणि प्रेमापोटी कार्यकर्त्यांकडून अनेकदा वेगवेगळे संकल्प व उपक्रम केले जातात.मुक्ताईनगर तालुक्यातील एका कार्यकर्त्याने देखील असाच संकल्प केला आहे.कुऱ्हा काकोडा येथील श्रीराम हरिभाऊ इंगळे या युवकाने मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांचा ४ जूनला विजय झाल्यावरच पायात चप्पल घालणार ! असा संकल्प केला आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्याशी सामना होणार आहे.श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीराम इंगळे याने पुढाकार घेत अनवाणी प्रचार करण्याचा निश्चय केला आहे.कुऱ्हा काकोडा गावासह मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात श्रीराम इंगळे प्रचार करत असून श्रीराम पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन जनतेला करत आहेत.
काल दि.६ मे सोमवार रोजी श्रीराम इंगळे यांनी उमेदवार श्रीराम पाटील यांची घोडसगाव येथे भेट घेतली.यावेळी श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार श्रीरामने बोलून दाखवला.श्रीराम इंगळे सध्या भर उन्हाळ्यात अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता प्रचार करीत असून त्यांचा हा संकल्प श्रीराम पाटील यांना लोकसभेत पोहोचवणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.