Just another WordPress site

अंदमान निकोबारमध्ये मोसमी वारे दाखल !! कसा असेल पुढचा प्रवास ? !!

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२० मे २४ सोमवार

मोसमी वारे रविवारी १९ मे रोजी अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहोचले आहेत त्यामुळे मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून आता मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी मालदीव,कोमोरीन परिसर,निकोबार बेटे,दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.केरळात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला जोरदार पूर्वमोसमी पाऊस दक्षिण भारतात सुरू आहे.अरबी समुद्रातून पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासून उंच आकाशात संपूर्ण साडेचार किमीच्या जाडीत समुद्री वारे वाहणे आवश्यक असतात.सध्या त्यांनी निम्मी जाडी व्यापली आहेत.आग्नेय अरबी समुद्र व केरळ किनारपट्टीवर ढगाची दाटी होणे आवश्यक असते.सध्या अति जोरदार पावसाला सुरुवात झाली असून आठवडाभर पावसाची शक्यता जाणवते तसेच नैऋत्य दिशेकडून केरळाकडे जमीन समांतर ताशी ३० किमी समुद्री वारे वाहने आवश्यक असतात.सध्या ते उत्तरेकडे व नंतर वायव्येकडे वळत आहे व त्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे.संध्याकाळनंतर रात्रभर अरबी समुद्रातील पाणी पृष्ठभागवरून प्रति चौ.मिटर क्षेत्रफळावरून १९० वॉट्स क्षमतेने लंबलहरी उष्णता ऊर्जा उत्सर्जित होऊन वर आकाशात बाहेर फेकणे आवश्यक असते.सध्याची तिची २०० वॉट्सची क्षमता १० मे लाच ओलांडली आहे.

केरळतील विखुरलेल्या १४ वर्षामापी केंद्रापैकी १० केंद्रावर अडीच मिमी व अधिक पावसाची नोंद होणे आवश्यक असते.ही नोंद सध्या पूर्ण नसली तरीही नोंद वाढत आहे त्यामुळे अंदमानहून केरळाकडे होणारी मोसमी पावसाची वाटचाल वेगाने होऊन २८ ते ३ जून दरम्यानच्या कोणत्याही दिवशी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.पुढील दोन दिवस कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता असून कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह प्रति तास ४० ते ५० ते वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.विदर्भ,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.