घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ !! चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एसआयटी स्थापना !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ मे २४ बुधवार
दि.१३ मे रोजी मुंबईत झालेल्या बेमोसमी पावसामुळे आणि प्रचंड वादळी वाऱ्यांमुळे घाटकोपरचे महाकाय होर्डिंग कोसळून १६ जणांचा बळी गेला.तर ही संख्या आता १७ वर पोहचली आहे कारण या घटनेतील आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.या अपघातातील जखमींची संख्या ७३ झाली आहे तसेच या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे.घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर १२० बाय १२० स्क्वेअरफुटांचे महाकाय होर्डिंग लावण्यात आले होते व या जाहिरातीच्या होर्डिंगच्या मंजुरीवरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.परंतु कोसळलेल्या या फलकाखाली अनेक गाड्या दबल्या होत्या.जवळच पेट्रोल पंप असल्याने तिथे बचावकार्यास अडचणी येत होत्या त्यामुळे गेल्या ४८ हून अधिक तास तिथे बचावकार्य चालले होते.गॅस कटरच्या सहय्याने हे होर्डिंग काढण्यात आले त्यानंतर होर्डिंगखाली दबलेल्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या त्यापैकी एका कारमध्ये दोन मृतदेह सापडले आहेत.एनडीआरएफकडून हे प्रयत्न सुरू असतांना त्यांनी आधीच मृतांची संख्या वाढणार असल्याचे सूचित केले होते त्यानुसार १६ तारखेला उशिरा दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यामुळे एकूण मृतांची संख्या १६ झाली होती आता आज मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील मृतांची संख्या १७ झाली आहे तर ७३ जण जखमी आहेत.
ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी करण्यात आली.लोखंडी खांब कापताना ठिणगी उडून आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी बाळगावी लागत होती.ती घेऊनही बुधवारी सकाळी काम सुरू असतानाच अचानक तेथे आग लागली होती मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाण्याचा मारा केल्याने ही आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली आणि त्यानंतर काम पुन्हा सुरू झाले होते.कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले असून या सुट्या भागांसह सगळा ढिगारा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.फलकाचे चार मोठे खांब हटवल्याशिवाय मदतकार्य पूर्ण होणार नव्हते.प्रत्येक खांब तुकड्यांमध्ये कापून तो वेगळा केला गेला त्यामुळे बचावकार्यास उशीर झाला असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.