विश्लेषण : पोलीस नायक
दि.२९ मे २४ बुधवार
उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.काही वर्षांपासून तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे.राजस्थानच्या फलोदी येथे रविवारी २६ मे रोजी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.देशातील मुख्यत: उत्तरेकडील भागांत सतत उष्णतेच्या लाटेची नोंद करण्यात येत आहे.राजस्थान,पंजाब,हरियाणा,चंदिगड,दिल्ली,उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) रेड अलर्ट जारी केला आहे.या राज्यांतील लोकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातदेखील प्रचंड उष्णता जाणवत आहे.विदर्भातील काही भागांत उकाडा इतका वाढला आहे की,अकोलासारख्या शहरात संभाव्य उष्णतेच्या लाटेमुळे ३१ मे पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.पाकिस्तान आणि अमेरिकेच्या काही भागांमध्येही अत्यंत उष्ण हवामान आहे त्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न उद्भवला आहे की,माणसाचे शरीर नक्की किती तापमान सहन करू शकते आणि शरीरासाठी हे तापमान जास्त झाल्यास काय परिणाम होतात? याचविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
माणसाचे शरीर किती उकाडा सहन करू शकते?
जागतिक तापमानवाढीचे संकट संपूर्ण जगासमोर आहे.शास्त्रज्ञ,हवामान विभागाचे अधिकारी,संशोधक या तापमानवाढीमुळे चिंतेत आहेत. मानवी शरीरात हायपोथॅलॅमस असते जे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते.माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्या प्रसरण पावल्याने,घाम आल्याने,तोंडाने श्वास घेतल्याने हायपोथॅलॅमसला ऊर्जा मिळते आणि हायपोथॅलॅमस शरीरातले तापमान नियंत्रित करू शकते त्यामुळेच उष्णता वाढली तरी माणसाचे शरीर एका मर्यादेपर्यंत सहन करू शकते.तज्ज्ञांनुसार आर्द्रतेचा (ह्युमिडिटी) परिणामही तापमानवाढीवर होतो.दरवर्षी तापमानात वाढ होत आहे आणि तापमानवाढीबरोबर आर्द्रतादेखील वाढत आहे.सिडनी विद्यापीठातील थर्मल एर्गोनॉमिक्स प्रयोगशाळेतील ओली जे यांनी २०१४ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार एक व्यक्ती जी विश्रांती घेते,कमीत कमी कपडे परिधान करते, अतिशय कोरड्या खोलीत राहते, १० टक्के आर्द्रतेत राहते आणि सतत पाणी पिते तीच व्यक्ती ११५ डिग्री फॅरेनहाइट किंवा ४६.१ डिग्री सेल्सिअस तापमान सहन करू शकते.२०२१ मधील आणखी एका अभ्यासात असे म्हटले आहे की तापमान १२२ अंश फॅरेनहाइट म्हणजेच ५० अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानंतर मानवी शरीर उष्णता नियंत्रित करू शकत नाही.
उष्ण तापमान आणि आर्द्रतेमुळे मृत्यू?
उष्ण तापमान आणि आर्द्रता या दोन्हींचा परिणाम शरीरासाठी घातक ठरतो.संशोधकांनी म्हटले आहे की,वातावरणात जितकी जास्त आर्द्रता असते तितके शरीराला उष्णता नियंत्रित करणे कठीण होते त्यांना आढळले की,वातावरणात आर्द्रता असते तेव्हा हवेत जास्त पाणी असल्याने शरीराला घाम फुटत नाही त्यामुळे शरीराला थंड करणे कठीण होते त्यांना असेही आढळून आले की,लोक जास्त उष्ण तापमान आणि आर्द्रतेच्या वातावरणामध्ये जगू शकत नाहीत.अतिउष्णतेचा अभ्यास करणारे नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेतील पोस्ट डॉक्टरल संशोधक कॉलिन रेमंड यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले, “जर ‘वेट बल्ब टेंपरेचर’ (उष्ण तापमान आणि आर्द्रता) मानवी शरीराच्या तापमानापेक्षा जास्त वाढले तरीही तुम्हाला घाम येतो;परंतु तुमचे शरीर थंड होत नाही.
अतिउच्च तापमानाचा शरीरावर काय परिणाम होतो?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत लोक अधिक वेगाने श्वास घेऊ लागतात आणि त्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढतात.प्रत्येक व्यक्तीचे शरीर अतिउच्च तापमान नियंत्रित करू शकत नाही मग त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात अशा परिस्थितीत शरीराचे तापमान वाढते आणि ‘हीट स्ट्रेस’चा त्रास होतो.मळमळ,चक्कर येणे,डोकेदुखी,बेशुद्ध पडणे,शरीरात पाण्याची कमतरता,अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसतात.
मेंदुज्वराचा धोका
इंग्लंडमधील रोहॅम्प्टन विद्यापीठातील जीवन आणि आरोग्य विज्ञानाचे प्राध्यापक लुईस हॅल्सी यांनी मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते यावर अभ्यास केला त्यांनी ‘एनबीसी न्यूज’ला सांगितले की,लोकांचे शरीर सामान्य उष्ण तापमान नियंत्रित करू शकते. परंतु जास्त उष्णतेमुळे शरीरातील प्रथिने (प्रोटीन) नष्ट होतात आणि मेंदूला नुकसान पोहोचते.पूर्वी केलेल्या अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की,अभ्यासाने आधीच दर्शविले आहे की,तीव्र तापमानाचा मानवी शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर परिणाम होतो.असे आढळून आले आहे की,तापमान वाढल्यावर त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो मग त्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडतात. काही प्रकरणांमध्ये अतिउष्णतेमुळे मेंदुज्वरदेखील होऊ शकतो. मेंदूशिवाय हृदय,किडनी व फुप्फुसे यांच्यावरही दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येते असे तज्ज्ञ सांगतात.
स्वतःचे संरक्षण कसे करावे?
तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी फारसे काही करता येत नाही पण स्वत:चे रक्षण करण्यासाठी सावधगिरी बाळगता येते.प्रथम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःला हायड्रेटेड ठेवा आणि आवश्यक असल्यास इलेक्ट्रोलाइट्स पावडर टाकलेले पाणी प्या.भरपूर पाणी प्यायल्याने शरीराला घाम फुटतो ज्यामुळे शरीराची उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत होते.त्याशिवाय थंड पाण्याने आंघोळ करा,थंड पदार्थांचे सेवन करा आणि हलके कपडे परिधान करा.कपडे घालून,तुमच्या ठिकाणचे तापमान कमी करा.अतिशय गरम वाटत असल्यास वातानुकूलन साधने (कूलर, एसी) वापरा परंतु वातानुकूलन यंत्र सतत वापरण्याची एकदा सवय झाली की मग शरीर त्याशिवाय राहू शकत नाही आणि त्यामुळे शरीराची उष्णता सहन करण्याची क्षमतादेखील कमी होऊ शकते.इतरही शाश्वत धोरणे आहेत.परंतु हवामान बदलामुळे वाढणारी उष्णता कमी करण्यासाठी देश आणि शासन व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.