सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ मे २४ शुक्रवार
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या कृत्याचे कोणीही समर्थन करणार नाही परंतु मनुस्मृती अभ्यासात यावी या भाजपच्या प्रयत्नाला काँग्रेसचा नेहमीच विरोध असेल.मनुस्मृती हा कालबाह्य ग्रंथ असून अभ्यासक्रमामध्ये तो आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.कोल्हापूरहून भुईंज ता.वाई दौऱ्यावर असतांना नाना पटोले यांनी कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधला.तसेच प्रचारातील महाविकास आघाडीच्या ‘संविधान बचाव’च्या मुद्यावर ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ‘संविधान बचाव’ म्हणून प्रचार केला परंतु महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य संविधान विरोधी असून याचे उत्तर जितेंद्र आव्हाडच देतील अशी सावध भूमिका पटोले यांनी घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानाची काँग्रसला धास्ती लागल्याच्या भाजपच्या टीकेबाबत पटोले म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानस्थ बसत असले तरी काँग्रसने त्यांच्या ध्यानाची धास्ती घेतलेली नाही भाजपने पेरलली ती अफवा आहे.खरेतर पंतप्रधान म्हणून मोदींचे हे शेवटचेच ध्यान आहे.फक्त सध्या आचारसंहिता असल्याने त्यांचे ध्यान माध्यमांच्या माध्यमातून जगासमोर येवू नये अशी आमची अपेक्षा असून त्यांना पुढील काळात ध्यानच करत बसायचे आहे अशी टीकाही पटोले यांनी केली.राज्यात कॉंग्रेसला किती जागा मिळतील ? या प्रश्नावर ते म्हणाले,कॉंग्रेसने राज्यात एकूण १७ जागांवर निवडणूक लढवली आहे यातील १६ जागांवर कॉंग्रेसला निश्चित मोठे यश मिळेल परंतु एका जागेबाबत घासून निकाल होईल जर नशिबाने साथ दिल्यास यातही कॉंग्रेसचाच विजय होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनी दरे दौऱ्यात व्हायरल केलेल्या व्हिडिओ बाबत विचारले असता ते म्हणाले,मुख्यमंत्री सध्या गावी आले असून ते शेती करत असल्याचे चलचित्राच्या माध्यमातून दाखवत आहे मात्र राज्यात सध्या दुष्काळ असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत याकडे त्यांनी लक्ष दिले तर बरे होईल नंतर तुम्हाला शेतीच करायची आहे अशी कोपरखळीही त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावली.