यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ मे २४ शुक्रवार
‘माझी शाळा माझा फळा’ समूह व शिवाजी विद्यापीठ संगीत तसेच नाट्य शास्त्र विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दि.२४ मे ते २६ मे २४ रोजी संपन्न झाले.या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात महाराष्ट्रातील विविध कलाशिक्षक,चित्रकार, रांगोळीकार,सुलेखनकार यांनी सहभाग घेतला होता.यात खानदेशातील सुप्रसिद्ध निसर्ग चित्रकार भागवत तुकाराम सपकाळे एअरपोर्ट हायस्कूल कलाशिक्षक यांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर सुप्रसिद्ध सुलेखनकार मनोहर बाविस्कर हिमालय हायस्कूल या शाळेचे कलाशिक्षक यांचे ‘फळा तिथे शाळा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
यावेळी आयोजक अमित बोरकडे,स्वागताध्यक्ष सतीश उपळावीकर,संमेलनाध्यक्ष व्यंकटेश भट,प्रा.डॉ.डी.टी.शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,कैलास बिलोनीकर,सहसचिव मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई,अमोल येडगे भा,प्र,से,जिल्हाधिकारी कोल्हापूर यांची उपस्थिती लाभली.भागवत सपकाळे जळगाव तालुक्यातील फुपनी सारख्या छोट्या गावातून आपली चित्रकला पारंगत केली व पुढे त्यांनी नोकरीनिमित्त मुंबई येथे आल्यावर एअरपोर्ट हायस्कूल येथे कलाशिक्षक या पदावर कार्यरत आहेत.परंतु निसर्गाची ओढ व चित्रकलेची आवड यामुळे त्यांनी असंख्य निसर्ग चित्र निर्माण केले व कोरोना काळात पाच तासात २०० पेक्षा जास्त निसर्ग चित्र करण्याचा भारत रेकॉर्ड त्यांनी नोंदविला आहे.
तसेच सुप्रसिद्ध सुलेखनकार मनोहर बाविस्कर हे चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड या गावाचे सुपुत्र असून चित्रकलेची प्रचंड आवड असणाऱ्या या कलाकाराने आपले संपूर्ण जीवन कलेसाठी त्यांनी वाहून घेतले आहे.त्यांनी कोरोना काळात बाराशे पेक्षा जास्त गणपतीचे रूपे साकारली व गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले आहे.