नवी-दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ मे २४ शुक्रवार
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान उद्या दि.१ जून रोजी होत असून त्याआधीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठे विधान केले आहे.जर इंडिया आघाडीने या निवडणुकीत एनडीएचा पराभव केला तर पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना माझी पहिली पसंती असेल असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे तसेच प्रियांका गांधी वाड्रा यांनी काँग्रेस कुटुंबाच्या पांरपरिक रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी आम्ही आग्रह धरला होता मात्र त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला असेही खरगे म्हणाले.मल्लिकार्जून खरगे म्हणाले की,राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशात दौरा केला तसेच निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी न थांबता अविरत प्रचार केला.फक्त काँग्रेसच नाही तर आघाडीमधील पक्षांसाठीही त्यांनी प्रचार केला होता त्यामुळे पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हेच लोकप्रिय पर्याय असतील असेही खरगे म्हणाले.
एनडीटीव्हीशी बोलतांना मल्लिकार्जून खरगे म्हणाले की,राहुल गांधी हे माझी पहिली पसंती असतील व ते युवकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मल्लिकार्जून खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा त्यांनी पंतप्रधानपदाबाबत थेट बोलणे टाळले होते.निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीची बैठक घेऊन त्यात आघाडीच्या प्रमुखाबाबत निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.