मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१ जून २४ शनिवार
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत असून यानंतर या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.यातच निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकात ध्यानधारणा केली.यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला.पंतप्रधान मोदी यांचे ध्यानधारणा करतानाचे काही फोटो समोर आले असून यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले,‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करते ?’ ‘४ जूननंतर चक्र उलटी फिरणार आहेत’ अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारही बाजूंनी २७ कॅमेरे लागले आहेत. ध्यानामध्ये जो माणूस मग्न असतो तो कॅमेऱ्याकडे पाहत नाही मात्र पंतप्रधान मोदी चारही बांजूनी २७ कॅमेरे लावून ध्यानाला बसले आहेत हा लोकसाधनेचा अपमान आहे.पूर्वीच्या लोकांनी ध्यानधारणा करताना किती सिक्युरिटी वापरली होती ? आणि आता तीन हजार सुरक्षा रक्षक हाताशी पकडून हे ध्यान करत आहेत अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे यासंदर्भात बोलतांना संजय राऊत म्हणाले,“४ जूननंतर देशात चक्र उलटी फिरणार आहे.आम्हाला चिंता नाही आणि भितीही नाही.” काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी महायुतीत एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा आरोप केला होता त्यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले,“मी जे लिहितो तो सत्याचा आधार असतो म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता.महायुतीमध्ये पाडापाडीचा खेळ झाला आहे.तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मात्र आमची लढाई ही भाजपासोबरोबर होती.आम्ही भाजपाचा पराभव करत आहोत” असे राऊत म्हणाले.ते पुढे म्हणाले,“आज निवडणुकीचा सातवा टप्पा पार पडत आहे.निवडणूक आयोगाला हाताशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोयीच्या तारखा घेतल्या आहेत.राजकारणातील सेलिब्रिटी यांच्या तारखा बघून मुद्दामून नरेंद्र मोदी यांनी स्वतःची निवडणूक शेवट ठेवली” असा आरोपही संजय राऊत यांनी केला.खासदार संजय राऊत यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटल्याच म्हटले होते.त्यानंतर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजवाली होती. यासंदर्भात आता राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले,“भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या घटनाबाह्य सरकराने भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली.त्यांनी माझ्यावर खटला दाखल करावा असे आव्हान त्यांना आहे.महाराष्ट्राच्या निवडणुकीत या लोकांनी पैशांचा पाऊस पडला हे सत्य आहे.४ जूननंतर चक्र उलटी फिरणार आहे तेव्हा बघू.कितीही पैशांचा पाऊस पडला तरी देखील महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना यश मिळणार नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.