मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ जून २४ शुक्रवार
मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निकालांमध्ये भारतीय जनता पक्षप्रणीत एनडीएला बहुमत मिळाले असले तरी त्यांच्याकडून दावे करण्यात आलेल्या प्रमाणात जागा मात्र मिळवता आल्या नाहीत.विशेषत: उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपाची मोठी पीछेहाट झाली असून मुंबईतही महायुतीला मोठा फटका बसला आहे.मुंबईतल्या ६ जागांपैकी चार जागा महायुतीला मिळाल्या असून त्यातील पियूष गोयल यांचा मोठा विजय झाला असला तरी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांविरोधात रवींद्र वायकरांचा अवघ्या ४८ मतांनी अगदी निसटता विजय झाला त्यातही शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यावरच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा आरोप केला आहे.जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे.अशा प्रकारे प्रशासनाने एका पराभव होणाऱ्या उमेदवाराला जिंकण्यासाठी मदत केली जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पोस्टाने आलेल्या मतांची आधी मोजणी झाली त्यानंतर ईव्हीएमवर मतमोजणी करण्यात आली पण निकालाच्या शेवटी पुन्हा करण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये मात्र आधी ईव्हीएमची मते मोजण्यात आली आणि शेवटी पोस्टाने आलेली मते मोजली गेली म्हणून अमोल किर्तीकरांचा आधी २ हजार मतांनी विजयी घोषित केल्यानंतरही ४८ मतांनी पराभव झाला.निवडणुकांमध्ये अशाच प्रकारे गैरव्यवहार केला जातो असे जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबईतल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आधी अमोल किर्तीकर आघाडीवर होते त्यानंतर रवींद्र वायकरांनी आघाडी घेतली.दिवसभर या दोघांमध्ये काँटे की टक्कर दिसून आली मात्र दिवसाच्या शेवटी रवींद्र वायकर यांना ४८ मतांची आघाडी असल्याचे जाहीर करण्यात आले त्यावर अमोल किर्तीकरांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली त्यानंतर किर्तीकर एका मताने विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले पण नंतर पुन्हा मतमोजणी करण्यात आली त्यात आधीप्रमाणेच रवींद्र वायकरच ४८ मतांनी विजयी झाल्याचे निष्पन्न झाले असे सांगण्यात आले रात्री उशीरापर्यंत हे मतमोजणीनाट्य चालू होते.उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत चर्चेतला मतदारसंघ ठरला होता.अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला. किर्तीकर यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप करून संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला तसेच उत्तर पश्चिम लोकसभेत उमेदवार देण्यावरून शिंदे गटाने बराच वेळ घेतला अखेर रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले.
महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसल्याचे लोकसभा निकालांवरून स्पष्ट झाले आहे व त्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या आहेत त्यापाठोपाठ भाजपा व उद्धव ठाकरे गटाला प्रत्येकी ९ तर शरद पवार गटाला ८ जागांवर विजय मिळाला आहे.एकनाथ शिंदे गटाला ७ तर अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला आहे.त्याशिवाय सांगलीत काँग्रेसमधून बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांनाही विजय मिळाला आहे.या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला ३० जागांवर विजय मिळाला असून महायुतीला १६ जागा जिंकता आल्या आहेत.