पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ जून २४ शनिवार
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहेत.रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.प्रामुख्याने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,देशात सध्या सात ठिकाणी वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.गोव्याच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.प्रामुख्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरातील जिल्ह्यांना नारंगी इशारा देण्यात आला आहे.रविवारपासून पुढील तीन दिवस मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा कमजोर पडली आहे त्यामुळे तिची वाटचाल थांबली आहे.अरबी समुद्रातील शाखा वेगाने पुढे जाण्यास पोषक वातावरण आहे.पुढील चार दिवसांत मोसमी पाऊस राज्याच्या बहुतेक भागात दाखल होईल असेही हवामान विभागाने म्हटले आहे.दरम्यान पुणे आणि परिसरात शुक्रवारी सकाळी तासभर पाऊस पडला.सकाळपासून आकाश ढगाळलेले राहिले.कमाल,किमान तापमानात घट होऊन हवेत गारठा निर्माण झाला आहे पण अद्याप हवामान विभागाने पुण्यात मोसमी पाऊस दाखल झाल्याचे जाहीर केलेले नाही.पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर राहील.रविवारपासून पुढील तीन दिवस मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी,पश्चिम घाट,दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे असे माणिकराव खुळे,निवृत्त शास्त्रज्ञ,हवामान विभाग पुणे यांनी वर्तविला आहे.