Just another WordPress site

विशेष लेख : अध्ययन निष्पत्ती आणि शिक्षक-सौ.ज्योती लक्ष्मण जाधव

सौ.ज्योती लक्ष्मण जाधव-प्राथमिक शिक्षिका 

पोलीस नायक न्यूज (वृत्तसेवा) ;-

दि.१४ जुलै २४ रविवार

अध्ययन निष्पत्ती आणि शिक्षक

कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्राथमिक शिक्षणात संपूर्ण भारतभर पायाभूत साक्षरता व मूलभूत संख्याज्ञान यावर सर्वात जास्त भर देण्यात आला.त्यासाठी निपुण भारत अभियान या अभियानाची सुरुवात झाली.त्यानुसार विद्यार्थ्यांचे कोरोना काळात झालेले प्रचंड शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सर्व शिक्षकांना निपुण भारत मिशन अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.सन २०२७ पर्यंत सर्व विद्यार्थ्याना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त होणे हे एकच ध्येय सर्व शिक्षकांपुढे ठेवण्यात आले.या निपुण भारत प्रशिक्षणात सर्वात जास्त भर होता तो प्रत्येक इयत्तेनुसार ठरवून देण्यात आलेल्या अध्ययन निष्पत्ती वर !.

काय आहेत या अध्ययन निष्पत्ती?

तर प्रत्येक इयत्तेत दाखल असलेल्या विद्यार्थ्याने त्या इयत्तेत अपेक्षित असलेल्या क्षमतांची संपादणूक केली आहे किंवा नाही ते या अध्ययन निष्पत्तीच्या मदतीने आपल्याला समजते किंवा विशिष्ट इयत्तेनुसार विद्यार्थ्याला शिक्षकाने कोणत्या किमान आणि कमाल पातळीपर्यंत नेणे आवश्यक आहे ते शिक्षक व पालक या दोघांनाही समजते.(NIPUN) National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy.या अभियानातील मूलभूत बदल म्हणजे यात पालकांना देखील सहभागी करून घेतले गेले.अध्ययन निष्पत्ती लिहिलेली छोटी बुकलेट्स पालकांपर्यंत पोहचविण्यात आली तसेच शाळा स्तरावर प्रत्येक इयत्तेनुसार अध्ययन निष्पत्तीचे तक्ते दर्शनी भागावर लावण्यासाठी देण्यात आले.पालकांचे निपुण मेळावे भरवून त्यांना या अध्ययन निष्पत्ती ची माहिती देण्यात आली व त्यांचा पाल्य नेमका कोणत्या स्तरावर आहे याबाबत त्यांना सविस्तर माहिती या अध्ययन निषपत्तीच्या आधारे देण्यात आली.

माझ्या बाबतीत विचार केला तर इयत्ता १ लीच्या वर्गाची वर्गशिक्षिका म्हणून मी सर्वप्रथम इयत्ता १ लीच्या भाषा,गणित व इंग्रजी या विषयांना किती अध्ययन निष्पत्ती दिल्या आहेत ती संख्या मोजली व त्यानुसार इयत्ता १ लीच्या वर्गासाठी भाषा विषयासाठी १३,गणित १४ व इंग्रजी १७ अशा अध्ययन निष्पत्ती ठरवून देण्यात आल्या आहेत.शिक्षकाने या अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी विविध आनंददायी अध्ययन अनुभवांची योजना करून त्या साध्य करणे अपेक्षित आहे.उदा.इयत्ता १ ली साठी १३ नंबरची क्षमता आहे.यात लेखन शिकताना ऐकलेले आणि आपल्या मनातील विचार,विकास स्तरा नुसार चित्रे,आडव्या-तिरप्या रेषा,स्वयंपद्धतीने लेखन आणि स्वानियंत्रित लेखनाच्या माध्यमातून आपल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करणे.आता ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी मला शिक्षक म्हणून अध्ययन अनुभवांची छोट्या छोट्या गटात विभागणी करावी लागेल.त्या विशिष्ट अध्ययन निष्पत्तीला साध्य करण्यासाठी योग्यवेळी योग्य अध्ययन अनुभव देणे हे देखील महत्वाचे असेल.दरम्यान सर्वांना समान संधी मिळेल असा अध्ययन अनुभव निवडला गेला पाहिजे.उदाहरणार्थ वरील निष्पत्ती साध्य करताना मी मुलांना लेखन शिकवण्यासाठी आधी विविध कार्ड्सचा पुन्हा पुन्हा परिचय देईन.प्रत्येक कार्डवर जे अक्षर असेल ते वाचण्यास सांगण्यात येईल.समजा हे अक्षर ‘ल’ असेल तर शिक्षक ‘ल’ पासून सुरू अथवा शेवट होणारे शब्द सांगतील,फळ्यावर लिहितील,’ल’ चा आवाज नेमका कुठे होतो हे समजावून देतील.आता विद्यार्थ्याला त्याने कुठे कुठे ‘ल’ चा आवाज ऐकला आहे असे विचारतील.विद्यार्थी त्याने ऐकलेले ‘ल’ चे शब्द सांगेल.शिक्षक ते फलकावर लिहितील.

मी वर्गात ‘ल’ शिकवत असताना माझ्या विद्यार्थ्याना ‘ल’ चा आवाज असणारे शब्द शोधण्यास सांगितले तेव्हा एक मुलगा लेक असे म्हणाला नंतर तो म्हणाला आपल्या आईला एकच असतो तो लेक.मी विचारले म्हणजे काय रे ? तर म्हणतो कसा,आपल्या आईला आधी मुली असतात आणि नंतर लेक होतो.आता मात्र मी थक्क झाले.त्याला म्हटले असे काही नाही आधी लेक होतो आणि नंतर देखील ताई येऊ शकते पण त्याने त्याच्या अनुभव विश्र्वानुसार जे निरीक्षण नोंदवले त्यासाठी मला नव्याने अध्ययन निष्पत्ती लिहिण्याची गरज भासली.

सौ.ज्योती लक्ष्मण जाधव (प्राथमिक शिक्षिका)
जि प शाळा काळाडोह
तालुका.. यावल
जिल्हा..जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.