बांगलादेशातील हंगामी सरकार सर्वसमावेशक आणि बहुविध समाजवादी लोकशाहीसाठी आणि मुक्त,निष्पक्ष आणि सहभागात्मक निवडणुकांचे वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे बांगलादेशचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शनिवारी ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट’ला संबोधित करताना सांगितले.आता निवडणूक प्रणाली,न्यायव्यवस्था,स्थानिक सरकार,माध्यम,अर्थव्यवस्था आणि शिक्षणात महत्त्वपूर्ण सुधारणा करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे युनूस म्हणाले.दरम्यान युनूस यांनी ‘ग्लोबल साऊथ’मधील आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचे आवाहनही यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ग्लोबल साऊथ’मधील देशांसाठी सर्वसमावेशक आणि मानव-केंद्रित ‘ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट’ कार्यक्रम प्रस्तावित केला. याअंतर्गत व्यापार,शाश्वत वाढ,तंत्रज्ञान सामायीकरण आणि प्रकल्पांच्या सवलतीच्या वित्तपुरवठावर लक्ष केंद्रित केले जाईल असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.आर्थिक विकासाच्या नावाखाली गरजू देशांवर कर्जाचा बोजा पडणार नाही असे मोदी म्हणाले.‘ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्ट’ हा कार्यक्रम ‘ग्लोबल साऊथ’ मधील देशांनी ठरवलेल्या विकासाच्या प्राधान्यक्रमाने प्रेरित होईल असे त्यांनी सांगितले.