नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०१ नोव्हेंबर २४ शुक्रवार

रशियाला युक्रेनविरोधी युद्धात मदत केल्याबद्दल आणि निर्बंधांमधून पळवाटा मिळवून दिल्याबद्दल अमेरिकेने १९ भारतीय खासगी कंपन्या आणि दोन व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत.अमेरिकेच्या वित्त आणि परराष्ट्र विभागाने डझनभर देशांतील ४०० कंपन्यांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा उगारला असून ही आतापर्यंत केलेली सर्वांत मोठी कारवाई आहे.युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिका,युरोपसह संयुक्त राष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत.मात्र विविध देशांमधील खासगी कंपन्यांचे रशियाशी व्यवहार होत असून त्यामुळे पुतिन प्रशासनाला निर्बंधांमधून पळवाटा मिळत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.भारतासह चीन,संयुक्त अरब अमिराती, तुर्कस्तान,थायलंड,मलेशिया,स्वित्झर्लंड यासह अन्य काही देशांमधील रशियाला साहाय्यभूत होणाऱ्या २७४ कंपन्यांची यादी अमेरिकेच्या वित्त विभागाने प्रसिद्ध केली तर परराष्ट्र विभागाने १२० आणि वाणिज्य खात्याने ४० कंपन्यांना यादीत टाकले असून एकाच दिवसात तब्बल ४३४ कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लावले आहेत.भारतात अनेक उदयोन्मुख व्यवसाय असून या मार्गावर (रशियाला मदत करण्याच्या) जास्त पुढे जाण्यापूर्वी त्यांना थांबावे यासाठी आम्ही थेट आणि स्पष्टपणे बोलत आहोत असे अमेरिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईमध्ये मुख्यालय असलेली श्रेया लाईफ सायन्सेस प्रा.लि.ही कंपनी २०२३ पासून अमेरिकन नाममुद्रा असलेले तंत्रज्ञान रशियाला देत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. कोल्हापुरातील खुशबू हॉनिंग आणि नवी मुंबईतील दिघा येथील शार्पलाइन ऑटोमेशन या राज्यातील कंपन्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.तमिळनाडूतील ‘फुट्रेव्हो’ नावाची कंपनी रशियाला ओर्लान ड्रोनच्या निर्मितीसाठी उच्च तंत्रज्ञान पुरवीत असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.याखेरीज आभार टेक्नोलॉजी अँड सर्व्हिसेस बंगळूरु,असेंड एव्हिएशन दिल्ली,डेन्वास सर्व्हिसेस नवी दिल्ली,एम्सिटेक बंगळूरु,गॅलेक्झी बेअरिंग्ज अहमदाबाद,इनोव्हिओ व्हेंचर्स गुडगाव,केडीजी इंजिनीअरिंग दिल्ली,लोकेश मशिन्स लि हैदराबाद,मास्क ट्रान्स चेन्नई,ऑर्बिट फिनट्रेड राजकोट गुजरात,पायोनिअर इलेक्ट्रॉनिक्स नवी दिल्ली,आरआरजी इंजिनीअरिंग टेक्नोलॉजीज हैदराबाद,शौर्य एअरोनॉटिक्स दिल्ली,श्रीजी इम्पेक्स मेरठ,टीएमएसडी ग्लोबल नवी दिल्ली या कंपन्या तसेच नवी दिल्लीतील सुधीर कुमार आणि छत्तीसगडमधील विवेककुमार मिश्रा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.रशियाने युक्रेनवर अनधिकृत आणि अनैतिक युद्ध लादले असून त्या देशाला महत्त्वाचे युद्ध साहित्य आणि तंत्रज्ञान मिळण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका आणि आमचे सहकारी जगभरात निर्णायक कारवाई सुरूच ठेवतील असे वॉलि अडेयोमो,परराष्ट्र उपमंत्री, अमेरिका यांनी म्हटले आहे.