मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२२ नोव्हेंबर २४ शुक्रवार

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडले तर या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे त्यामुळे या निकालाकडे जनतेचे लक्ष लागले आहे.राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार येणार ? महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येणार ? याबाबत आता अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत.दरम्यान मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असून यामध्ये काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे तर काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात अपक्ष आणि छोटे पक्ष महत्वाचे ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे आता निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.मात्र त्याआधीच राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. विधानसभेच्या निकालाआधीच आमदार बच्चू कडू यांनीही सरकार स्थापनेबाबात मोठा दावा केला असून “आमचे सरकार येईल.अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार बनेल आणि मोठ्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

जवळपास एक महिना निवडणुकीच्या धावपळीत गेला.आम्ही १२ ही महिने काम करत असतो मात्र लोकांच्या कामांसाठी पळणे आणि निवडणुकीसाठी काम करणे वेगळे असते.आम्ही या मतदारसंघात नक्की निवडून येऊ असा विश्वास आहे मात्र आम्हाला दोन्हीही राष्ट्रीय पक्ष पाडण्यासाठी प्रयत्न करत होते.ते जिंकण्यासाठी प्रयत्न करत नव्हते त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम होता.दुसरे म्हणजे महाराष्ट्रात १२२ पैकी महाशक्तीच्या २५ ते ३० जागा टॉप लढतीत आहेत त्यामध्ये आमच्या १० जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.सरकारच आमचे येईल.अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार बनेल व मोठ्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ तशा पद्धतीची चर्चा सुरु आहे.आमच्याशिवाय कोणतेही सरकार सत्तेत येणार नाही.महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा देण्यापेक्षा आपणच सरकार बनवू आणि त्यांचा बाहेरून पाठिंबा घेऊ असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे तसेच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोणत्याही पक्षाचे किंवा आघाडी आणि युतीच्या जागाचा आकडा बहुमतापर्यंत जात शकत नाही असे दिसत आहे त्यामुळे आम्ही असल्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.