मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ नोव्हेंबर २४ शुक्रवार
विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी झाले असून आता निवडणुकीचा निकाल उद्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार येणार ? महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येणार ? याबाबत राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत त्यामध्ये काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे मात्र असे असले तरी निकाल समोर आल्यानंतरच कोणाला किती जागा मिळतात ? हे स्पष्ट होईल.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालाला एक दिवस बाकी असतानाच मुंबईत मोठ्या घडामोडी वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.काल सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत,काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात,काँग्रसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईतील ग्रँड हयात हॅाटेलमध्ये महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीत निकालानंतर किती जागा येतात ? आणि त्यानंतरची पुढील रणनीती काय असेल ? याबाबत चर्चा झाल्याची माहिती सांगितली जात आहे.एवढेच नाही तर या बैठकीनंतर जयंत पाटील,बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही चर्चा केली त्यामुळे मुंबईत नेमके काय घडतय ? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत.यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीचे सरकार नक्कीच येईल असा दावा करत महायुतीचे सरकार सत्तेवरून घालवण्याला आम्ही पहिले प्रधान्य देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमच्या बैठकीत एकच चर्चा झाली.आम्ही २८८ जागाचा आढावा घेतला तेव्हा आमच्या लक्षात आले की महाविकास आघाडीचे सरकार बनेल.महाविकास आघाडीचे सरकार नक्कीच येईल,आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही असे चित्र आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे.आम्हाला बहुमतापेक्षा कमी जागा येतील असे वाटत नाही. आम्हाला जुळवाजुळवीची गरज पडेल असेही वाटत नाही त्यानंतर आमच्याबरोबर कणी आले तर आनंदच मानतो.आता आधी निवडणूक झालेली आहे मग निकाल समोर येईल.मग सरकार बनवताना आम्ही मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करू.महायुतीचे सरकार सत्तेवरून घालवणे याला पहिले प्रधान्य आम्ही देतो असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.कोणत्याही अपक्षांबरोबर अद्याप चर्चा झालेली नाही मात्र नंतर ज्यांना आमच्याबरोबर यायचे ते येतील.निकालानंतर आमचा आकडा समोर आला की आम्ही राज्यपालांना त्याबाबतचे पत्र देऊ.नाना पटोले उद्या चर्चेसाठी येत आहेत तसेच आमचे नेते रमेश चेन्निथला हे देखील येत आहेत.काल झालेल्या चर्चेचा आढावाही आम्ही दिल्लीला देणार आहोत.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आमच्या संपर्कात आहेत ते देखील सतत आढावा घेत आहेत.आमचा कोणीही आमदार फुटणार नाही त्यामुळे ती काळजी आम्हाला नाही.आमचा आकडा चांगला आल्यानंतर आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार आणि सरकार बनवणार.काल आमच्या झालेल्या बैठकीत एक ठरले आहे की मतमोजणीच्यावेळी शेवटचे मत मोजून झाल्यानंतर प्रमाणपत्र घेतल्यानंतर बाहेर पडायचे त्याआधी आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी बाहेर यायचे नाही असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.