“यावेळी उटी,गुवाहाटी जाणार नाही तर जिवाची मुंबई करू” !! शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले सत्ता स्थापनेसाठीचे ‘डेस्टिनेशन’ !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ नोव्हेंबर २४ शुक्रवार
एकनाथ शिंदे ज्या दिशेने जातील त्या दिशेने आम्ही जाऊ असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे त्यामुळे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे जाणार ? यावर चर्चा सुरू झाली आहे.२०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून अनेक आमदारांना सुरतवरून गुवाहाटीला नेले होते.गुवाहाटीनंतर गोव्यात आणि मग मुंबईत येऊन त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली होती.यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय परिस्थिती असेल ? यावर चर्चा होत असतांना विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मग यावेळी उटी किंवा गुवाहाटी जाणार का ? असा प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी यावेळी गुवाहाटीला जाणार नसल्याचे म्हटले आहे.मागच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सूरत,गुवाहाटी आणि गोव्याला गेले होते त्यामुळे यावेळी निवडणुकीनंतर उटी जाणार की गुवाहाटी ? असा प्रश्न टीव्ही ९ वृत्तवाहिनीने संजय शिरसाट यांना विचारला होता यावर ते म्हणाले की,आम्हाला उटी किंवा गुवाहाटी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.आम्ही सगळे मुंबईतच जाऊन जीवाची मुंबई करू.आमदारांचा गटनेता निवडण्यासाठी सर्व आमदारांना एकत्र ठेवावे लागते त्यासाठी आम्ही सगळे मुंबईत जाऊ आणि तिथेच सत्तास्थापनेचा दावा केला जाईल.
संजय राऊतांनी आम्हाला लंडनला पाठवावे
दरम्यान संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका करतांना म्हटले की,अदाणी यांनी मणिपूरमध्ये रिसॉर्ट बांधले आहे.आम्ही संजय शिरसाट यांना तिथे पाठविणार आहोत.या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की,आम्हाला मणिपूरला घेऊन जाण्यापेक्षा संजय राऊत यांनी आम्हाला लंडनला घेऊन जावे. आम्हालाही लंडन फिरता येईल आणि आयुष्याचे सार्थक होईल तसेच आज पुन्हा त्यांनी याच विषयावर भाष्य केले.शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, आम्हाला गुवाहाटी भाग २ करण्याची आवश्यकता नाही.आम्ही दुसरा एखादा प्रदेश पाहू,याची चिंता विरोधकांनी करू नये.भारत भ्रमण करण्याची आम्हाला हौस आहे. महायुतीची सत्ता आणण्याकडे आमचे लक्ष आहे.
अपक्ष आमदारांसाठी हेलिकॉप्टर,विमाने आधीच बुक
यंदाच्या निवडणुकीत अपक्षांचा आकडा मोठा असू शकतो अशी एक शक्यता आहे.निकालानंतर त्यांना लवकर मुंबई आणावे लागेल यासाठी हेलिकॉप्टर आणि विमाने बुक केल्याची चर्चा आहे यावर बोलतांना संजय शिरसाट म्हणाले,महायुतीची सत्ता शंभर टक्के येणार आहेच पण शेवटच्या क्षणी जोखीम नको म्हणून काही खबरदारीचे उपाय राबवते.अपक्षांना संपर्क साधणे हा नियमित राजकारणाचा भाग आहे.अपक्षांना देखील याची जाणीव असते.