दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
धामणगाव रेल्वे येथे श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून भाविक गुरुकुंजात येतात.दि.१४ शुक्रवार रोजी गुरूकुंजात लाखो भाविक दाखल झाले.दरम्यान धामणगाववरून गुरूकुंजाच्या दिशेने जाणाऱ्या गुरुदेव भक्तांसाठी धामणगाव रेल्वे येथील गुरुदेव लंगर सेवा समितीच्या वतीने अन्नछत्राचे आयोजन केले होते.यावर्षी अन्नछत्रात सुमारे सहा हजार गुरुदेव भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.नांदेड,किनवट,माहूर,पुसदसह तेलंगाणा,आंधप्रदेशातुन येणारे अनेक गुरुदेवभक्त धामणगाव मार्गेच गुरूकुंजात जातात.यावेळी काही भाविक तर सुमारे चोवीस तासांपेक्षा अधिक प्रवास करून पोहचले.यावेळी गुरुदेव भक्तांसाठी धामणगाव ते अंजनसिंगी मार्गावरील जुना धामणगावजवळ असलेल्या सोहनतारा कॉम्प्लेक्स येथे अन्नदान करण्यात आले.यामध्ये सर्व राजकीय पक्ष,सामाजिक संघटनांनी एकत्रपणे सहभाग घेतला.श्री गुरुदेव लंगर समितीच्या पुढाकाराने आयोजित या अन्नछत्रास गुरुदेव पूजनाने सुरुवात करण्यात आली.त्यानंतर अन्नछत्रात यवतमाळ,पांढरकवडा,वणी,वरोरा,चंद्रपूर,गडचिरोली,आदिलाबाद,राळेगाव,कळंब या भागातून येणाऱ्या हजारो भाविकांनी लाभ घेतला.सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या अन्नछत्राकरिता श्री गुरुदेव तालुका सेवा समिती धामणगाव रेल्वे यांच्यासह धामणगाव शहरातील विविध दानदाते व सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले.प्रसंगी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या गुरुदेव भक्तांसाठी याच ठिकाणी अखंड खंजेरी भजनाचे आयोजन केले होते.प्रवास करून येणाऱ्या गुरुदेव भक्तांसह धामणगाव रेल्वे येथील स्थानिक भजन गायक महिला मंडळासह,सिध्दी विनायक गुरुदेव सेवा मंडळानेही यामध्ये सहभाग घेतला.
धामणगाव रेल्वे शहरात गेल्या ६ वर्षापासून सुरु असलेल्या या धार्मिक आयोजनात पक्षभेद विसरून सर्वच राजकीय नेते मंडळी सहभागी झाले होते.यावर्षी अन्नछत्रात माजी आमदार अरुण अडसड,आमदार प्रताप अडसड,माजी आमदार वीरेंद्र जगताप,शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विनोद तलवारे,काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष चंदू डहाणे,लायन्स क्लबचे सुनिल वोरा,डॉ. रिपल राणे व अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहिली.