Just another WordPress site

लाडकी बहीण योजना सुपरहिट !! महायुतीला सत्ता मिळाली !! लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार ? !! एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२५ नोव्हेंबर सोमवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले असून जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सादर केली आणि ही योजना तातडीने लागू करण्यात आली.या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती व त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे पाच हप्ते (७५०० रुपये) पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान,महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजने अंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार आहोत.महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला २१०० रुपये दिले जातील त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत (२८८ पैकी २३५ जागा) मिळाले असून लवकरच महायुती सत्ता स्थापन करणार आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे.तसेच आगामी हप्त्याद्वारे १५०० रुपये दिले जाणार की २१०० रुपये असा प्रश्न सर्वांना पडला आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले,“ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता २१०० रुपये होतील.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे.बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती झाली आहे”.

शिवसेनेच्या (शिंदे) गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या व काही सामान्य महिलांशी बातचीत केली.यावेळी महिलांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले,“आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत.आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत.तुम्ही मतदाना वेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे.मला पत्रकार नेहमी विचारायचे की तुमच्या किती जागा येणार ? त्यावेळी मी त्यांना म्हणायचो,आम्हाला बहुमत मिळेल परंतु तुम्ही आम्हाला बहुमतापेक्षा जास्त जागा दिल्या आहेत.मी म्हणायचो आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल परंतु तुम्ही तर विरोधकांना डम्पिंग मध्ये टाकले आहे.

लाडकी बहीण योजना सुपरहिट : एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले,“लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे.मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे”.दरम्यान यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशा घोषणा दिल्या.“एकनाथ शिंदे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, “महिलांचा आशीर्वाद असणार,एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार”, “इडा पिडा टळू दे,लाडक्या भावाचे राज्य येऊ दे” अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.