Just another WordPress site

भाजपच्या मित्रपक्षांची मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी !! शिंदेंसाठी शिवसेनेच्या आमदारांनी कंबर कसली !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठीं पक्षाच्या सर्वच आमदारांनी कंबर कसली असून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली आहे.त्यांच्या ‘लाडकी बहीण योजने’ला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे.त्यांनी जाहीर केलेल्या योजना आणि विकासाच्या जोरावर हे यश मिळाले आहे त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री पदाची पुन्हा संधी मिळाली पाहिजे असा सूर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठकीसाठी आलेल्या आमदारांनी लावला.काही जणांनी मात्र सावध भूमिका घेताना तिन्ही पक्षांचे वरिष्ठ ठरवतील तो निर्णय मान्य असेल असे सांगितले.विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत.महायुतीतील तीन प्रमुख पक्षांपैकी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिली अडीच वर्षे पुन्हा संधी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या पक्षाकडून होत आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी पक्षांचे कार्यकर्ते व संघ परिवार करीत आहे.

शिंदे यांच्यासाठी त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्यांचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते.त्यात गैर नाही त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे असे म्हाडाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.मंत्रिमंडळ विस्तारात मला यावेळी नक्की संधी मिळेल त्यासाठी मी चार कोट तयार ठेवले आहे.यापूर्वीच्या मंत्र्यांना पुन्हा संधी न देता नवीन आमदारांना संधी द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील असे उदय सामंत,संजय राठोड आणि गुलाबराव पाटील या वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितले.संध्याकाळी तीन वाजल्यापासून राज्यातील शिवसेना शिंदे पक्षाचे विजयी उमेदवार मुंबईत येण्यास सुरुवात झाली नांदेड जिल्ह्यातील बाबुराव कोहळीकर,आनंद तिडके आणि बालाजी कल्याणकर या तीन आमदारांना आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष विमान पाठविले होते.शिवसेना शिंदे पक्षाला एक अपक्ष व तीन छोट्या पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. या चार आमदारांमध्ये जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी पाठिंबा देताना यंदा शिवनेरीला कॅबिनेट पद राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी केली.हातकणंगले येथील जनस्वराज्य पार्टीचे अशोक माने,शिरोळ मतदारसंघातील राजश्री शाहू विकास आघाडीचे राजेंद्र पाटील येरड्रावकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड येथील आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेना शिंदे पक्षाला पाठिंबा जाहीर केला.

अजित पवारांकडे नेतृत्व देण्याची राष्ट्रवादीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच मुख्य प्रतोद म्हणून अंमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांची निवड झाली आहे.अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी ही बैठक पार पडली.या बैठकीमध्ये पक्षाध्यक्ष अजित पवार,कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अनेक आमदारांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असे अजित पवार यांनी सांगितले.एक लोकप्रतिनिधी या नात्याने जनसेवेस आपण सदैव कटिबद्ध राहू आणि आपले मतदारसंघ व राज्य विकासाच्या पथ्यावर पुढे नेऊ असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या ५९ जागा लढवल्या होत्या पैकी ४१ जागा जिंकल्या आहेत.आजच्या बैठकीला पक्षाचे बहुतांश नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते.बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी पक्षात भावना असणे साहजिक आहे मात्र आम्ही वास्तववादी आहोत.मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील.भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला असतानाच महायुतीतील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे.शिंदे यांच्यापेक्षा कधीही फडणवीस आमच्यासाठी अधिक योग्य आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात आली.एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात गेल्या दीड वर्षात फारसे सख्य नव्हते.अगदी निवडणुकीतही उभयतांनी परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते.राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या चर्चेत फडणवीस यांच्याच नावाचा दिल्लीत आग्रह धरण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.