छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार

महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून २३९ जागा महायुतीला मिळाल्या आहेत.भाजपा १३२ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार ? याचा पेच कायम आहे.अजित पवार या शर्यतीत नाहीत कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमची काही हरकत नाही असे म्हटले आहे मात्र एकनाथ शिंदेंनी तसे जाहीर केलेले नाही.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.दरम्यान महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असेच संकेत आहेत.दुसरीकडे भाजपाच्या महिला आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्ताने पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरु आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी राज्यभरातून भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.छ.संभाजीनगरमध्ये देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महिला आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्रलिहिण्यात आले आहे.गेली पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केले आहे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली मात्र त्यांनी कामामध्ये कुठलीच कसर सोडली नाही यामुळे देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे अशी मागणी छत्रपती संभाजीनगरच्या भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सत्तास्थापनेचा दिवस आला आहे.आमच्या देवाभाऊंनी पाच वर्षांच्या कालावधीत जो संघर्ष केला आहे व जनतेसाठी अविरत काम केले आहे.लोकांनी त्यांना त्रासही दिला तरीही त्यांनी त्याचा विचार न करता जनहिताचे काम अविरत सुरु ठेवले.महाराष्ट्रात त्यांनी महायुतीलाही मोठे यश मिळवून दाखवले.महायुतीच्या ज्या जागा निवडून आल्या आहेत त्या देवाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे म्हणून मी माझ्या रक्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पत्र  लिहिले आहे असे महिला आघाडीच्या मनिषा मुंडे यांनी माध्यमांना सांगितले.भाजपाच्या महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांची हीच अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत.तूर्तास तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायम आहे मात्र संघ आणि भाजपाने देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत.नेमक्या काय राजकीय घडामोडी होतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.