मुंबई,ठाण्यातील ‘टोरेस’ घोटाळ्याचे थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन !! आरोपी रशिया व उझबेकिस्तानचे तर मास्टरमाईंड युक्रेनचा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ जानेवारी २५ बुधवार
मुंबईत उघड झालेल्या ‘टोरेस’ कंपनी घोटाळ्यातून आता नवनवे खुलासे समोर येऊ लागले आहेत.‘टोरेस’ नावाने मुंबई,ठाणे व आसपासच्या भागात शाखा सुरू करून कंपनीने जवळपास सव्वालाख ग्राहकांना चुना लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चौथ्या आरोपीविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.हे तिन्ही आरोपी आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीच्या वरीष्ठ पदांवर काम करत आहेत.आठवड्याला ११ टक्के व्याजदर परतावा देण्याचे आमिष दाखवून ‘टोरेस’ नावाच्या आऊटलेट्समध्ये ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून घेतली.आधी सोने,हिऱ्याचे दागिने विकण्यापासून सुरुवात केलेल्या या कंपनीने गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसा उभा करायला सुरुवात केली.सुरुवातीच्या काळात सांगितल्याप्रमाणे आठवड्याला व्याजदर परतावा दिलादेखील पण सोमवारी अचानक कंपनीच्या सर्व शाखांना टाळे बघून गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले व या शाखांच्या बाहेर हवालदिल झालेल्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.सगळे पैसे घेऊन ‘टोरेस’ने पोबारा केल्याचे स्पष्ट झाले.
ना ‘टोरेस’, पण मूळ कंपनी वेगळी !!
या प्रकरणात दाखल तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता ‘टोरेस’च्या मागची मूळ कंपनी वेगळीच असल्याचे समोर आले असून Hern Pvt Ltd असे या कंपनीचे नाव असून ‘टोरेस ज्वेलरी’ या नावाखाली त्यांनी तब्बल सव्वा लाख लोकांची १ हजार कोटींची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकारात कंपनीच्या तीन वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक केली असली तरी कंपनीच्या दोन संस्थापकांनी विदेशात पलायन केल्याचा संशय पोलिसांना आहे.हे दोघे युक्रेनचे नागरिक आहेत.हेच दोघे या सगळ्या घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.जॉन कार्डर आणि व्हिक्टोरिया कोवलेन्को अशी त्यांची नावे असून या दोघांविरोधात लुकाआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
प्रकरण आर्थिक गुन्हे तपास शाखेकडे वर्ग !!
या प्रकरणाची व्याप्ती पाहता हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.त्याआधी मंगळवारी शिवाजी पार्क पोलिसांनी ५२ वर्षीय जनरल मॅनेजर तानिया सॅसातोवा उर्फ तझागल कारासॅनोव्हना सॅसातोवा,३० वर्षीय संचालक सर्वेश अशोक सुर्वे व ४४ वर्षीय स्टोअर इनचार्ज व्हॅलेंटिना गणेश कुमार यांना अटक केली आहे.तानिया ही उझबेकिस्तानची नागरिक आहे.व्हॅलेंटिना ही रशियन वंशाची असून तिने भारतीय व्यक्तीशी विवाह केला आहे.
आधार कार्ड बनवून देणारा झाला संचालक !!
या प्रकरणातली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला तिसरा आरोपी सर्वेश सुर्वे हा आधार कार्ड बनवून देणारे एक केंद्र चालवतो पण त्याला कागदोपत्री ‘टोरेस’चा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते व या तिघांनाही १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.