नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ मार्च २५ शनिवार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी म्हणाले की,भारत आमच्याकडून खूप जास्त आयातशुल्क वसूल करतो.इतके की तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाहीत. आता भारताचा कुणीतरी भांडाफोड केल्यामुळे त्यांनी आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.भारताने अमेरिकेशी व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी आयातशुल्क कमी करण्याची तयारी दर्शविल्यानंतर काही तासांत ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल म्हटले होते की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा केला तेव्हाच त्यांनी दोन्ही देशांना लाभ होईल असा द्वीपक्षीय व्यापार करार (BTA) करत त्यावर वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली होती.वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे अमेरिकेत होते.अमेरिकेतील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रातील द्वीपक्षीय व्यापार करारावर सहमती दर्शविली आहे.
व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांशी बोलतांना ट्रम्प यांनी सांगितले की,आमच्या देशाला प्रत्येकाने लुटले आहे.आम्ही ही लूट थांबवली आहे.माझ्या पहिल्या टर्ममध्ये मी यावर काही प्रमाणात निर्बंध आणले होते.अमेरिकेला आर्थिक,वित्तीय आणि व्यापारी दृष्टीकोनातून जगातील अनेक देशांनी लुटले आहे.माझ्या दुसऱ्या कार्यकाळात ही लूट थांबविण्याचा मी प्रयत्न करत आहे.
तत्पूर्वी ५ मार्च रोजी अमेरिकेच्या संयुक्त अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातशुल्क वाढीला जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती.त्यांनी म्हटले की,भारता आमच्याकडून अधिक आयातशुल्क वसूल करत आहे तर मग आम्हीही आयातशुल्क वाढवू.काल शुक्रवारी माध्यमांशी बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की,युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धावर तोडगा काढण्यासाठी ते रशियावर बँकिंग निर्बंध आणि आयातशुल्क लावण्याचा गंभीरतेने विचार करत आहेत.ट्रुथ या सोशल मीडियावरील अकाऊंटवर एक पोस्ट टाकून ट्रम्प यांनी याबाबतचे सुतोवाच दिले आहेत.