“औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी तुमच्या परदेशात शिकत असलेल्या मुलांना पाठवा” !! नागपूर दंगलीवरून संजय राऊत यांचे जोरदार टीकास्त्र !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेटलेला औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आता राज्यसभेत पोहचला असून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी हात मुद्दा काल राज्यसभेत उपस्थित केला.यावेळी ते म्हणाले,मणिपूरनंतर महाराष्ट्र जळत आहे,नागपूरमध्येही दंगली होत आहेत.गृह मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत देशाला पोलीस स्टेट (सरकारी नियंत्रण) बनवले आहे.याचबरोबर संजय राऊत यांनी केंद्र सरकारला औरंगजेबची कबर तोडण्याचे आव्हान दिले व औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी तुमच्या परदेशात शिकत असलेल्या मुलांना पाठवा असेही म्हटले आहे.दरम्यान संजय राऊत यांच्या या भाषणावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील सभागृहात उपस्थित होते.गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेत सहभागी होत राऊत यांनी सरकारवर टीका केली.त्यांनी आरोप केला की देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती वारंवार औरंगजेबाचे नाव घेत आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांचा समावेश आहे. जर तुम्हाला औरंगजेबाची कबर तोडायची असेल तर खुशाल तोडा,तुम्हाला कोण रोखत आहे.केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे.मुख्यमंत्री तुमचे आहेत,गृहमंत्री तुमचे आहेत तिथे जावा आणि तोडा.पण कबर तोडण्यासाठी तुमच्या मुलांना पाठवा आमच्या नाही.तुमची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत,परदेशात नोकरी करत आहेत आणि गरीब मुलांची माथी भडकावून ही कामे करायला लावत आहात असे संजय राऊत यांनी नमूद केले आहे.
दरम्यान गेल्या ३०० वर्षात नागपूरमध्ये एकही दंगली झालेली नाही असे सांगून राऊत म्हणाले,“औरंगजेबाचे नाव पुन्हा पुन्हा घेऊन देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपैकी काही महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ पदांवरील लोक आहेत.जर आपण त्यांना रोखले नाही तर हा देश एकसंध आणि एकात्मिक राहणार नाही”.यावेळी संजय राऊत असेही म्हणाले की,“देशाची एकता आणि अखंडता राखणे हे गृह मंत्रालयाचे काम आहे परंतु गेल्या काही वर्षांत देशाचे रूपांतर पोलीस स्टेटमध्ये (सरकार नियंत्रित) झाले आहे.गृह मंत्रालय राजकीय विरोधकांना कमकुवत करत आहे आणि राजकीय पक्ष फोडत आहे.”छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आंदोलनामध्ये धार्मिक साहित्य जाळल्याच्या अफवांवरून सोमवारी संध्याकाळी नागपूरच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.नागपुरात झालेल्या हिंसाचारात पोलिस उपायुक्त दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांसह तेहतीस पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.नागपूरमधील न्यायालयाने या प्रकरणातील १७ आरोपींना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान आणि इतर पाच जणांवर देशद्रोह आणि सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.