शासनाच्या विविध योजनांमुळे आदिवासींचे जीवनमान उंचावले !! यावल येथे आदिवासी दिनानिमित्ताने आमदार अमोल जावळे यांची स्पष्टोक्ती !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ ऑगस्ट २५ सोमवार
येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबवत आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावले असून आगामी काळात विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक लाभ घेऊन उच्चशिक्षित व्हावे.तसेच शिक्षणातूनच अधिक प्रगतीचा मार्ग साध्य करता येईल असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी केले असून ते यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आयोजित शासकीय जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.
शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात शासकीय जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमापूर्वी शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या आदिवासी तडवी कॉलनी तसेच मनुदेवी मंदिर येथून सजीव देखाव्यांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीचा समारोप एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात झाला.या ठिकाणी रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना आमदार जावळे यांनी सांगितले की,शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आज आदिवासी समाज बांधवांचे जीवनमान उंचावले असून शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ दिला जात आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासन कटीबद्ध असून आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घ्यावे व शैक्षणिक प्रगतीतुन सर्वांगीण विकास सह शक्य होणार आहे असे ते म्हणाले.दरम्यान या कार्यक्रमात नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टरव्दारे दाखवण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थितीत एन एस यु आय राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी,परसाडे सरपंच मिना तडवी,फैजपुर विभागीय प्रांताधिकारी बबन काकडे,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे सह आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत हे वृक्ष देऊन करण्यात आले.या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांनी केली तर सुत्रसंचालन नरेंद्र राठोड यांनी व आभार सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी मानले.