सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०४ एप्रिल २६ शनिवार
बारामती येथे सायबर आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात एका व्यक्तीची सुमारे १ कोटी ३० लाख २ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती बारामती शहर पोलीसांनी दिली आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांना “F24 Indian Stock Market Investors Discussion Group” नावाच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील करण्यात आले होते व या ग्रुपमधील व्यक्तींनी शेअर मार्केट,IPO आणि ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.त्यानंतर त्यांना FARLEYLLC नावाचे App डाउनलोड करून त्यावर खाते उघडण्यास सांगण्यात आले.या App वर बनावट स्वरूपात नफा दाखवून फिर्यादी यांना वारंवार अधिक पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले.आरोपींनी अधिक गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे सांगत विविध कारणांनी फिर्यादीकडून मोठ्या रकमा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करून घेतल्या.तपासात ही रक्कम विविध खात्यांमध्ये वळवून ATM,Cash Deposit Machine आणि इतर व्यवहारांद्वारे काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी बारामती शहर पोलीसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे तसेच या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ४४ लाख रुपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये फ्रीज करण्यात पोलीसांना यश आले आहे.मुख्य आरोपी व संपूर्ण सायबर फसवणूक रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,अनोळखी WhatsApp किंवा Telegram ग्रुप, सोशल मीडियावरील गुंतवणूक ऑफर तसेच हमखास नफ्याच्या आमिषाला बळी पडू नये.कोणतेही App डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी आणि कोणालाही बँक तपशील OTP किंवा UPI PIN देऊ नये.सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्वरित १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.