सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २६ मंगळवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत शोककळा पसरली असून संपूर्ण तालुका अजूनही त्या दुःखातून सावरलेला नाही व अशा भावनिक वातावरणात बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.काल दि.६ एप्रिल सोमवार रोजी त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून २०१ बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.अर्ज दाखल करण्याच्या वेळी बारामतीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.“दादा” म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे बारामतीच्या जनतेसाठी केवळ नेते नव्हते तर कुटुंबातील सदस्यासारखे होते. त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.अनेक कार्यकर्त्यांनी “दादा परत येणार नाहीत पण त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली” असे सांगत अश्रूंनी निरोप दिला.
यावेळी बोलताना सुनेत्राताईंनी अत्यंत भावूक शब्दांत आठवणींना उजाळा दिला.“अजितदादा शब्दाला जाणणारे नेते होते.त्यांनी दिलेला शब्द कधीच मोडला नाही.बारामती त्यांच्यासाठी आईसारखी होती.या मातीत त्यांनी आयुष्य घालवले आणि या मातीतल्या लोकांसाठीच ते जगले,” असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला.उपस्थित नागरिकही या क्षणी भावुक झाले.त्यांनी पुढे सांगितले की,“दादांनी सुरू केलेला विकासाचा वेग कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे.बारामतीचा विकास पूर्वीसारखाच नव्हे तर अधिक वेगाने होईल.नवीन प्रकल्प,गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन.प्रशासनावर दादांचा जो दरारा होता ती ओळख कायम राहील. बारामतीत गुंडागर्दी आणि खंडणीला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.”
या उमेदवारी अर्ज दाखल सोहळ्याला महायुतीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे,धनंजय मुंडे,आदित्य तटकरे तसेच जय पवार आणि पार्थ पवार यांची उपस्थिती होती.सर्वांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दर्शवत “दादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची ताकद त्यांच्यात आहे” असा विश्वास व्यक्त केला.दरम्यान बारामतीतील जनतेत एकमुखाने अशी भावना व्यक्त होत आहे की,या निवडणुकीत कोणताही विरोध उभा राहणार नाही आणि ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.“दादांवरील प्रेम आणि आदर म्हणून बारामतीची जनता हा निर्णय घेईल,” असे स्थानिक कार्यकर्ते सांगत आहेत.अनेकांनी ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनिक असल्याचे स्पष्ट केले.
अजितदादांनी बारामतीत केलेला विकास,उभारलेली पायाभूत सुविधा,उद्योग आणि शेतीसाठी केलेले प्रयत्न यामुळे बारामती आज राज्यातील एक आदर्श तालुका म्हणून ओळखला जातो.त्यांच्या कार्याचा ठसा इतका गडद आहे की,प्रत्येक रस्त्यात,प्रत्येक प्रकल्पात आणि प्रत्येक योजनेत “दादा” जिवंत असल्याची भावना लोकांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी ही केवळ राजकीय पाऊल नसून दादांच्या स्वप्नांना पुढे नेण्याची जबाबदारी म्हणून पाहिली जात आहे.बारामतीकरांच्या भावना, दादांवरील प्रेम आणि विकासाचा वारसा यामुळे ही पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात विशेष ठरणार आहे.