महेंद्र पाटील
उपसंपादक पोलीस नायक
तुळशी विवाह विशेष माहिती :-
तुळस विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते.आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहचते अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराण सांगते.तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे.तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे.तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात.कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात. मुख्यतः द्वादशीच्या दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे.जाणून घेऊया तिथी मुहूर्त,विवाहाची वेळ,विवाहाची तयारी,पूजा साहित्य,पूजा विधी,श्र्लोक मंत्र इत्यादी.
तिथि आणि मुहूर्त:-
पंचांगानुसार यंदा कार्तिक एकादशी ४ नोव्हेंबरला साजरी होणार आहे.कार्तिक शुक्ल द्वादशी पासून तुळशी विवाह सुरू होतात.तुळशीचे लग्न ५ नोव्हेंबरपासून सुरु होतील.८ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुळशी विवाह साजरे केले जातील.यंदा ८ नोव्हेंबरला
संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांपर्यंत कार्तिक पौर्णिमा असणार आहे.
विवाहाची वेळ:-
विवाहाची वेळ ही गोधूळी (गाई चरुन घरी येण्याची वेळ)म्हणजे सायंकाळची असते.
विवाहाची तयारी:
तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करतात.वृंदावनास रंग लावून त्यावर स्वस्तिक काढतात.राधा-दामोदर प्रसन्न असें लिहीतात.वृंदावनातील तुळशीत चिंचा,आवळे व ऊस खोचून ठेवतात ऊसाला वधूच्या मामाचा मान आहे.वृंदावनाभोवती मांडव घालावा.केळीचे गाभे,आंब्याच्या डहाळ्या,टाळे,फुलांच्या माळा वगैरे लावाव्या.वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी घालावी.
पूजा साहित्य:-
हळकुंडे,विड्याची पानें,सुपार्या,खोबर्याच्या वाट्या,हळद-कुंकू,इत्यादि पूजा साहित्य.नारळ,पंचा,खण,नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ,निरनिराळी फळे,लाह्या,बत्तासे आदि.
पूजाविधी:-
“श्रीमन् महागणपतये नमः असा मंत्र म्हणून तुलसीसहित श्रीगोपालकृष्ण प्रीत्यर्थ विवाहोत्सांगध्यानावहनादि षोडशोपचार पूजन करिष्ये “असे म्हणून कळस,शंख,घंटा व दीप यांची पूजा करावी.
ध्यान करावे व खालील श्र्लोक म्हणावा.
ध्यानाचा श्र्लोक:
शान्ताकारम् भुजगसहयनम् पद्मनाभं सुरेशं ।
विश्र्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्व लोकैकनाथम् ।
यानंतर गोपालकृष्ण ताम्हनांत घेऊन तुलसी व गोपालकृष्णाची पूजा करावी यानंतर तुळशीची प्रार्थना करावी.मंगलाष्टके म्हणावी नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षदा टाकून टाळ्या वाजवाव्या.वाद्ये वाजवावी.पूजा करणाऱ्याने एक फुलांची माळ गोपालकृष्णाला व दुसरी फुलांची माळ तुळशीला घालावी नंतर तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावी.
तुळसी पूजन मंत्र:-
तुळसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुळसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।