सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा) :-
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली.आज दि.९ मे मंगळवार रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत शरद पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले आहे तर संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे.आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची चर्चा आहे.कर्मवीर पुण्यतिथी दिनी नऊ मे रोजी दर तीन वर्षांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते.आज दि.९ रोजी त्या निवडी होणार होत्या मात्र या निवडी पूर्ण झाल्या नाही.यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष,आजीव सेवक आणि व्यवस्थापक मंडळाचे सदस्य यांची निवड करण्यात आली मात्र सचिव पदावर कोणालाही संधी देण्यात आलेली नाही तर विठ्ठल शिवनकर यांनाच सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.नवीन सचिवाची निवड पुढील कालावधीत केली जाणार आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
यातील कार्याध्यक्ष व उपकार्याध्यक्ष पदाची निवड २७ मे २३ रोजी पुण्यात होणार आहे.रयत शिक्षण संस्थेच्या शाखांची वाढती संख्या व वाढती जबाबदारी लक्षात घेता प्रशासन गतिमान केले जाणार असल्याचे सूतोवाच शरद पवार यांनी भाषणातून केले होते त्यानुसार आगामी काळात सचिव पदासाठी माजी सनदी अधिकारी आणि साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची निवड केली जाणार असल्याची चर्चा असून या बैठकीला स्वतः विकास देशमुख हजर होते.आज नेमण्यात आलेले उपाध्यक्ष,आजीव सेवक व व्यवस्थापक मंडळाचे सदस्य पुढील प्रमाणे आहेत.उपाध्यक्ष –जयश्री चौगुले वाशी,अरुण कडू पाटील उरण,ॲड.राम कांडगे पुणे,महेंद्र लाड पलूस,आजीव सेवक प्रतिनिधी – प्राचार्य डॉ.ज्ञानदेव मस्के,आनंदराव तांबे,प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवनकर,विनोद कुमार संकपाळ,सुभाष लकडे,प्राचार्य डॉ.सुरेश ढेरे, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य ॲड.भगीरथ शिंदे,माजी मंत्री अजित दादा पवार,आमदार दिलीप वळसे पाटील,रामशेठ ठाकूर,ॲड.रवींद्र पवार,मीनाताई जगधने,आमदार डॉ.विश्वजित कदम,प्रभाकर देशमुख,चंद्रकांत दळवी,अजित भिकू कोंडा पाटील,राहुल जगताप,जनार्दन जाधव,दादाभाऊ कळमकर,प्राध्यापक सदाशिव कदम आणि धनाजी बलभीम पाटील,आजीव सेवक प्रतिनिधी नवनाथ जगदाळे,डॉ.संजय नगरकर,ज्योस्ना सुधीर ठाकूर अशा प्रकारे संचालक मंडळाची निवड करण्यात आली असल्याचे सूत्रांनी कळविले आहे.