Just another WordPress site

‘बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबण्याची शक्यता’-भारतीय हवामान खात्याचा अंदाज

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळवण्याकरीता पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे कारण अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असून याचा परिणाम केरळात धडकणाऱ्या मान्सूनवर होणार आहे परिणामी कोकणाच्या दिशेने सरकत येणारा मान्सूनही उशिरा होणार आहे.अरबी समुद्रात खोलवर हे चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीवर याचा फारसा परिणाम जाणवणार नाही तसेच या चक्रीवादळामुळे येणाऱ्या पावसाचीही शक्यता नाही परंतु मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.तसेच ८,९,१० जून रोजी कर्नाटकात गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याचा वेग ४०-५० KMPH असण्याची शक्यता आहे.या काळात नैऋत्य अरबी समुद्र,कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे  ट्वीट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी केले आहे.

अरबी समुद्रात खोलवर सोमवारी सायंकाळी चक्रीवादळ वेगाने तीव्र झाले.मंगळवार सकाळपर्यंत या चक्रीवादळाचा वेग वाढत गेला आणि वादळ आग्नेय अरबी समुद्रावर येऊन धडकले हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम नैऋत्य किनाऱ्यापासून ९२० किमी अंतरावर आहे तर मुंबईच्या दक्षिण-नैऋत्यपासून ११२० किमी अंतरावर आहे.पोरबंदरच्या दक्षिण भागापासून ११६० किमी तर पाकिस्तानातील दक्षिण कराचीपासून १५२० किमी अंतरावर आहे.चक्रीवादळ्याच्या सध्याच्या गतीनुसार हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने घोंघावत जात आहे त्यामुळे भारतीय समुद्र किनाऱ्यांना या वादळाचा धोका नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.हे वादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे तर पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर पुढील २४ तासांत चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.वादळ तीव्र झाल्यानंतर हे वादळ बिपरजॉय चक्रीवादळ म्हणून ओळखले जाईल.बांगलादेशने हे नाव दिलेले आहे.उत्तर हिंदी महासागरात तीन आठवड्यांत निर्माण होणारे हे दुसरे चक्रीवादळ असेल.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळाने बांगलादेश आणि म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.