मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक अचानक बेपत्ता होतायत,विरोधकांच्या हत्या होतायत तर काही विरोधकांचे अचानक मृत्यू झाले आहेत तर काहींचे तुरुंगात मृत्यू झाले आहेत या मृत्यूची कारणे समोर आलेली नाहीत यामुळेच पुतीन यांचे विरोधक त्यांना हुकूमशाह म्हणू लागले आहेत.दरम्यान भारतातही विरोधी पक्ष सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हुकूमशाह म्हणू लागले आहेत.मोदींचा राजकीय प्रवास पुतीन यांच्या दिशेने चालू असल्याची टीका सातत्याने होत असते.दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटानेदेखील नरेंद्र मोदी पुतिन यांच्यासारखे वागत असल्याची टीका केली आहे.ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी ते म्हणाले,नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या बाबतीत पुतिन यांच्यापेक्षा काय वेगळं वागतायत? फक्त अजून आम्हाला तुरुंगात घालून मारले जात नाही. आम्हाला भर रस्त्यावर गोळ्या घातल्या जात नाहीत.विरोधकांवर विषयप्रयोग करून मारले जात नाही,आमच्या अशा प्रकारे हत्या होत नाहीयेत हे आमच्यावरचे उपकारच आहेत असे म्हणावे लागेल.पुतिन यांच्या रशियात किंवा अन्य देशांमध्ये ज्या प्रमाणे विरोधकांना संपवले जातंय ते पाहता भारतातली २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपावाले घोटाळे करून जिंकले तर ही लोकशाही मार्गाने होणारी शेवटची निवडणूक असेल.भाजपावाले ही निवडणूक जिंकणार नाहीत परंतु घोटाळे करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करतील.
संजय राऊत म्हणाले,चंदीगडमधील महापौरपदाच्या निवडणुकीत जो प्रकार झाला तो सर्वोच्च न्यायालयाने आत्ता तरी रोखला आहे परंतु, इतरही ठिकाणी असे होऊ शकते.या देशात ईव्हीएमविरोधात फार मोठे आंदोलन चालू आहे मात्र कोणतीही माध्यमे त्याला महत्त्व देत नाहीत. आपल्या देशात काळ्या पैशाचा वापर करून आमदार,खासदार,नगरसेवक खरेदी केले जात आहेत परंतु माध्यमांना त्याचे गांभीर्य नाही.तसेच भारतात सक्तवसुली संचालनालयासह (ईडी) इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा (सीबीआय,आयटी) वापर करून विरोधी पक्ष फोडले जात आहेत, नेते फोडले जातायत.त्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात घेतले जात आहे ही लोकशाहीसाठी सूचिन्ह नाहीत.महाराष्ट्र असेल किंवा अन्य राज्ये असतील प्रत्येक ठिकाणी ईडीचा गैरवापर होतोय.प्रखर बोलणाऱ्यांविरोधात,आंदोलने करणाऱ्या पक्षांविरोधात ईडी,सीबीआयच्या माध्यमातून आव्हान उभे केले जात आहे परंतु शिवसेना असेल,उद्धव ठाकरे,अरविंद केजरीवाल,ममता बॅनर्जी,हेमंत सोरेन,तेजस्वी यादव,शरद पवार यांच्यासह आम्ही सर्वजण आजही देशातल्या हुकूमशाहीविरोधात लढायला उभे आहोत.आम्ही लढू आणि जिंकूही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.