यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ एप्रिल २४ गुरुवार
मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने काल दि.१७ एप्रिल बुधवार रोजी शहरातील विविध भागात श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने श्री राम जय राम ! जय जय राम !! च्या गजरात अवघी व्यास नगरी दुमदुमली हे विशेष !.
यानिमित्ताने शहरातील सातोद रस्त्यावरील श्रीराम मंदिर,महर्षी व्यास मदिरावरील श्री राम मंदिर व कोहळेश्वर श्रीराम मंदिरात जन्मोत्सवा निमित्त ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात श्रीरामाचे पुजन करण्यात आले.प्रसंगी रामनवमी निमित्ताने सकाळ पासुनच सर्व मंदिरात मोठया संख्येने हजारो भाविक,भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला व दर्शनाकरीता दिवसभर ये-जा सुरू होती.शहरातील सातोद कोळवद रस्त्यावर असलेल्या श्री शनी मंदिरातील पेठच्या श्रीराम मंदिरात सकाळ पासुनच श्रीराम नामाचे किर्तनाने भक्त भाविकांचे लक्ष वेधले होते.दरम्यान पारंपारिक पध्दतीने रामदेव बाबा भजनी मंडळ,काळभैरव भजनी मंडळ,भोलेबाबा भजनी मंडळचे रूपचंदजी घारू,कमलाकर घारू,हेमराज घारू यांच्यासह आदींनी प्रभुश्रीरामावर आधारीत भजन सादर केले तर दुपारी १२ वाजेला मंदिराचे पुजारी पप्पु महाराज जोशी यांच्या हस्ते मंदिरात शास्त्रोक्त पध्दतीने पुजा करून आरती संपन्न झाली.