यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० मे २४ शुक्रवार
तालुक्यातील साकळी येथे गाव प्रथेनुसार काल दि.९ मे गुरुवार रोजी साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवादरम्यान शिवचरित्रावर आधारित बॅनर लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी नसल्याचे कारण देत पोलीस प्रशासनाने सदरील बॅनर काढायला लावले व उपस्थित शिवप्रेमींना मारहाण केल्याची घटना घडल्याने शिवजयंती मिरवणुकीदरम्यान बराच वेळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील यांनी ठिय्या आंदोलन करीत पोलीस प्रशासनाच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त करीत नाराजी व्यक्त केली.
याबाबत अधिक वृत्त असे की,तालुक्यातील साकळी येथे गाव प्रथेनुसार दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आदल्या दिवशी शिवजन्मोत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा असून त्यानुसार काल दि.९ मे गुरुवार रोजी शिवजन्मोत्सवाचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या उत्सवातच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण व्हावे या उद्देशाने गावातील महात्मा फुले चौक व चौधरी वाड्याच्या कोपऱ्यावर शिवचरित्रावर आधारित एका प्रसंगाचे बॅनर शिवप्रेमीं नागरिकांकडून लावलेले होते.सदरचे बॅनर लावण्यास साकळी ग्रामपंचायतीची परवानगी नसल्याचे कारण देत पोलीस प्रशासनाने सदर बॅनर काढायला लावले.प्रसंगी बॅनर काढल्याने संतप्त झालेल्या शिवप्रेमींची व पोलिसांशी बाचाबाची झाली व त्यावर पोलिस प्रशासनाने शिवप्रेमी नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.दरम्यान पोलिसांनी काही शिवप्रेमी तरुणांना ताब्यात घेतले व त्यांना ही मारहाण केली.सदरहू पोलिसांच्या मनमानी कारभाराविरुद्ध तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवप्रेमींना तात्काळ सोडावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांचेसह अनेक पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलकासमोर बसुन ठिय्या आंदोलन करीत पोलिसांच्या वागणुकीबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या.या ठिय्या आंदोलना दरम्यान काही काळ मिरवणूक थांबवण्यात आली होती व मिरवणुकीच्या काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते.तसेच गावातील प्रतिष्ठीत मंडळीच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाल्यावर मिरवणुकीला नियोजित मार्गाने सुरुवात करण्यात आली.सदर मिरवणुकीत शिवप्रेमींचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला.दरम्यान किरकोळ मारहाणीचा प्रकार वगळता बाकी सदरील मिरवणूक मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली.