संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज !! साताऱ्यात ६४ वैद्यकीय अधिकारी व ५३६ कर्मचारी तैनात
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जून २४ बुधवार
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी साताऱ्यात ६४ वैद्यकीय अधिकारी,५३६ आरोग्य कर्मचारी,३९ रुग्णवाहिका,१७ आरोग्य दूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याशिवाय २१ वैद्यकीय पथकेही तैनात असणार असून एक हजार ४० आंतररुग्ण खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे तर ७२ कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत.पालखी सोहळा उत्साहात,शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात काल पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री.देसाई यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,पोलीस अधिक्षक समीर शेख,उपवन संरक्षक अदिती भारद्वाज,अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे,निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील,फलटण व खंडाळ्याचे प्रांताधिकारी,तहसिलदार यांच्यासह सबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नियोजनाची माहिती दिली.पालखी सोहळ्यासाठी यंदा एक हजार ८०० फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ७४ ठिकाणी तात्पुरती मुतारी,२४ ठिकाणी महिलांसाठी बंदीस्त स्नानगृहांची सोय करण्यात आली आहे.सुलभ इंटरनॅशनल संस्थेमार्फत पाडेगाव येथे १७ शौचालये आणि ५ स्नानगृहे व लोणंद येथील तळावर ३९ शौचालये आणि २ स्नानगृहे कायमस्वरुपी उभारण्यात आली आहेत.त्याशिवाय हॉटेल,ढाबे,सार्वजनिक शौचालय युनिट,मंगल कार्यालय अशा एकूण १३५ ठिकाणी ४६८ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच १५ निवारा शेड उभारण्यात आली आहेत.मुक्कामाच्या ठिकाणी पाणी,वीज,आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.महिला वारकऱ्यांसाठी बंदीस्त स्नानगृहाची व्यवस्था असावी.पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पाणी,वीज,आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल,कत्तलखाने,मासळी बाजार,दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.