दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील मानव विज्ञान विद्या शाखेतील चार महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणा एनइपी २०२० अंतर्गत स्वीकृत क्लस्टर पद्धती मधील विद्यार्थी भिमुख धोरण राबवण्याकरिता समन्वय करार करून इतिहास विभागासाठी विविध उपक्रम राबवण्याची संधी उपलब्ध करून दिली. प्रत्येक महाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यरत आयक्यू एसी अंतर्गत प्राचार्य डॉ. जयंत चतुर, प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे, प्राचार्य डॉ. विलास राऊत, प्राचार्य डॉ. निवृत्ती पिस्तूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरणात एनइपी २०२० अभिप्रेत असलेल्या क्लस्टर पद्धतीला अनुसरून चार महाविद्यालयातील इतिहास विभागांनी समन्वय करार केला.यामध्ये चार महाविद्यालय यांचा समावेश आहे.इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा,निबंध लेखन,स्थानिक इतिहास लेखन,चर्चासत्र, कार्यशाळा,शैक्षणिक सहल यासारखे विद्यार्थी कल्याण व अभ्यासक्रम पूरक विविध उपक्रम राबवले जाणार असून विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी होऊन कौशल्य विकास वृद्धिंगत करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. जयंत चतुर यांनी शुभेच्छा पर संदेशातून व्यक्त केले.तसेच सीबीसीएस पॅटर्न संदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
या समन्वय कराराची सुरुवात प्राचार्य डॉ. जयंत चतुर यांच्या अध्यक्षतेखाली वाधवानी महाविद्यालयात इतिहास विषयाचे अभ्यास मंडळ स्थापनेतून झाली. नवीन शैक्षणिक धोरण आणि सीबीसीएस पॅटर्न हा विद्यार्थी व शिक्षकांना जागृत करणारा शिक्षण पद्धतीचा भाग असून सर्वांनी त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. चतुर यांनी केले. याप्रसंगी अभ्यास मंडळाचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. कविता तातेड यांनी विद्यार्थी विकास आणि अभ्यास मंडळ यावर प्रकाश टाकला. अभ्यास मंडळाचे उद्देश प्रास्ताविकातून स्पष्ट करताना डॉ. सिद्धार्थ जाधव यांनी विद्यार्थी जीवन आणि विषयाचे अध्ययन यासंदर्भातील समयोचित मार्गदर्शन केले. डॉ संदीप घुर्ले यांनी इतिहास लेखन शास्त्र व विविध विचार प्रवाह या संदर्भात वाचन लेखन चिंतन करून इतिहासाची मांडणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन वेदिका राठोड यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धार्थ जाधव इतिहास विभाग प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार वेदिका खोडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.