अकरावी ऑनलाइन प्रवेश विरोधात शिक्षक संघटना आक्रमक !! ऑफलाइन प्रवेशाचे अधिकार मिळणेकरिता शिक्षक महासंघाकडून शिक्षण आयुक्तांना पत्र !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ जुलै २५ गुरुवार
महाराष्ट्र राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शिक्षण आयुक्त शालेय शिक्षण यांच्याकडे तातडीने चर्चा करण्याची मागणी केली आहे.या संदर्भात महासंघाने शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवून ऑनलाइन प्रवेश आणि ऑनलाइन संच मान्यतेमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे.
ऑनलाइन प्रवेशांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान !!
महासंघाने आपल्या पत्रात म्हटले आहे की,यावर्षी अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केल्यामुळे विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. याव्यतिरिक्त शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्गात ६० ऐवजी ८० आणि वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १२० विद्यार्थ्यांची सक्ती केल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांची संख्या घटली आहे तर स्वयंअर्थसहाय्यित तुकड्या वाढत आहेत.
शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात !!
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी कोचिंग क्लासेसकडे वळत आहेत व यामुळे अनुदानित तुकड्या कमी होऊन मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर काहींना आपली नोकरी गमवावी लागण्याची भीती आहे.महासंघाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी पाचवी फेरी आणि त्यानंतरचे प्रवेश गुणवत्तेनुसार ऑफलाइन पद्धतीने करण्याचे अधिकार महाविद्यालयांना देण्याची मागणी केली आहे.सध्या स्थानिक पातळीवर प्रवेशासाठी सुरू असलेल्या आंदोलनांची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहनही महासंघाने केले आहे.
ऑनलाइन संच मान्यतेबद्दल चिंता !!
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या ऑनलाइन संच मान्यतेच्या प्रस्तावित पद्धतीबद्दलही महासंघाने चिंता व्यक्त केली असून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या,वैकल्पिक विषय आणि विविध विषयांसाठीच्या तासिकांमध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवचिकता ठेवण्यात आली आहे.ऑनलाइन संच मान्यतेमध्ये ही लवचिकता कायम राहावी अन्यथा शिक्षक संख्या आणखी कमी होऊ शकते अशी भीती महासंघाने व्यक्त केली आहे.
तातडीच्या चर्चेची मागणी !!
या दोन्ही मुद्द्यांमुळे शिक्षक वर्गात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत या विषयांवर तातडीने चर्चा करण्याची विनंती शिक्षक महासंघाचे प्रा.संतोष फाजगे (सल्लागार),प्रा.लक्ष्मण रोडे (सचिव),प्रा.डॉ.अविनाश बोर्ड (कार्याध्यक्ष),प्रा.मुकुंद आंदळकर (समन्वयक),प्रा.डॉ.संजय शिंदे (उपाध्यक्ष),प्रा.शिवराम सुर्यवंशी,प्रा.रविंद्र पाटील (उपाध्यक्ष),प्रा.रविंद्र भदाणे (उपाध्यक्ष),डॉ.अशोक गव्हाणकर (कोषाध्यक्ष) आणि प्रा.दिलीप शितोळे (सहचिटणीस) यांनी केली आहे.