यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ ऑगस्ट २५ शनिवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचालित कला वाणिज्य व विज्ञान माविद्यालयात उर्दू व हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी विभागाच्या प्रा.प्रतिभा रावते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करुन गोदानकार मुंशी प्रेमचंद यांना जयंती निमित्त त्यांच्या साहित्यविश्र्वातील भरीव योगदानाबद्दल आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यावर प्रकाश टाकताना प्रा.प्रतिभा रावते यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध असलेल्या ‘गोदान’ कादंबरीचा आवर्जून उल्लेख करत ‘कफन’ या कथेतून होणारे मानवी मुल्यांचे पतन आणि असंवेदनशील होत चाललेल्या माणसाचे दर्शन घडविले.मुंशी प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ कथा,कादंबऱ्यातून ग्रामीण जीवनाचे वास्तव प्रकट होत असून आपला भोवताल अचूकपणे टिपणारे साहित्यिक म्हणून ते साहित्यविश्र्वात आजही अजरामर आहेत असेही त्या म्हणाल्या.अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य प्रा.खैरनार यांनी मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्याचा ‘सामान्य माणूस’ केंद्रबिंदू असून त्यांच्या साहित्यकृतीतून शेतकरी,कामगार,कष्टकरी स्री,क्षुद्र,दलित,बहुजन अशा सर्वच घटकांचे चित्रण येते म्हणून ते केवळ साहित्यिक,लेखक नव्हते तर थोर सुधारक देखील असल्याचे त्यांनी सांगितले.उर्दू विभागाचे प्रा.इम्रान खान यांनी शायराना अंदाजमध्ये कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका आपल्या प्रास्ताविकात नमुद करुन सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन करत तिहेरी कामगिरी बजावली.कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.हेमंत.जी.भंगाळे,हिंदी विभाग प्रमुख डॉ.पी.व्ही.पावरा,मराठी विभागाचे प्रा.रत्नाकर कोळी,भुगोल विभाचे प्रा.पंकज महाजन,प्राध्यापक,प्राध्यापिका आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.