वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट !! कारवाई का होत नाही ? नागरिकांचा संतप्त सवाल !!
सनी पटेल,पोलिस नायक
पुणे विभागीय प्रमुख
दि.२२ जुलै २६ बुधवार
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.नागरिकांकडून वारंवार तक्रारी आणि माहिती दिली जात असल्याचा दावा केला जात असतानाही प्रत्यक्षात प्रभावी कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की,अवैध धंदे सुरू असल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडे वेळोवेळी पोहोचविण्यात आली.मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल दिसून आलेला नाही त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही ? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
दरम्यान या प्रकरणासंदर्भात पोलिस नायककडे महत्त्वाचे दस्तऐवज,छायाचित्रे,व्हिडिओ आणि अन्य माहिती उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे.या माहितीची पडताळणी करून सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात येणार असून संबंधित सर्व बाबी तथ्यांच्या आधारे जनतेसमोर मांडल्या जातील.
या प्रकरणात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविषयी निष्कर्ष काढण्यापूर्वी निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.जर चौकशीत कोणत्याही व्यक्तीचा निष्काळजीपणा,संगनमत किंवा अन्य गैरप्रकार समोर आला तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.
नागरिकांचा प्रश्न सरळ आहे की जर अवैध धंदे सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळत असेल तर कारवाई का होत नाही ? कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असली पाहिजे.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
पोलिस नायक या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार असून उपलब्ध माहिती व पुराव्यांची पडताळणी करून पुढील भागात अधिक तथ्ये जनतेसमोर मांडणार आहे.सत्य समोर आणणे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे हीच आमची भूमिका आहे.
“सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला तरी पुरावे बोलतील.चौकशी झाली तर सत्य जनतेसमोर येईल.”