Just another WordPress site

किल्ले रायगडावर ३५० व्या शिवाराज्याभिषेक सोहळ्याची प्रशासकीय तयारी पूर्ण

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून २३ या कालावधीत ३५० वा शिवाराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून शिवभक्तांनी प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी केले आहे ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील व  पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते.शिवाराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासकीय तयारीची माहिती यावेळी पत्रकारांना दिली.राज्यसरकारच्या वतीने किल्ले रायगडावर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून या निमित्ताने गडावर सहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कालावधीत मोठ्या संख्येने शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने गडावर दाखल होणार आहेत.हि बाब लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असल्याचे म्हसे यांनी यावेळी सांगितले आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने ३६ समित्यांचे गठन केले असून या समित्यांच्या माध्यमातून गेली दोन महिने सोहळ्याचे नियोजन सुरू आहे.गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक व शिवभक्तांसाठी कोंझर,वालुसरे,कवळीचा माळ व पाचाड येथे वाहनतळांची उभारणी करण्यात आली आहे.एकाच वेळी साडेतीन हजार वाहने याठिकाणी पार्कींग करून ठेवता येणार आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर १० हजार लीटर आणि गडाच्या पायथ्याशी चाळीस हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे.शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २४ वैद्यकीय सेंटर्स तैनात केली जाणार असून यात गडावर सहा,पायऱ्यांवर सहा तर पायथ्याशी सात व वाहनतळांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत.गडावर अतिमहत्त्वाच्या वक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परीसरात ३ हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत तसेच गडावर व पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तयार करण्यात आली आहे.गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार असून रज्जू मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे त्यामुळे शिवभक्तांनी चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्गेच गडावर यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.हृदयविकार,मधुमेह व श्वसन विकार असलेल्या व्यक्तींनी गडावर येणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले असून याकरिता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले तर गडावर १०९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून दोन हजार पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.येणाऱ्या शिवभक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी १ हजार दिशा दर्शक फलक लावण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून गडावर फसाड पद्धतीची रोषणाई करण्यात येणार आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी स्वराज्याची राजधानी उजळून निघणार आहे याशिवाय गडाच्या पायरी मार्गावरही रात्री येणाऱ्या शिवभक्तांसाठी पथदिवे लावण्यात आले आहेत.१ ते ७ जून दरम्यान गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.गडावर शिवकल्याण राजा,शिववंदना,नंदेश उमप रजनी यासारख्या शिवमहिमा सांगणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे याशिवाय नामवंत शाहीर शिवमहिमा सांगणारे पोवाडे सादर करणार आहेत असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.