मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यात दोन वर्षांनंतर गणेशोत्सव व दहीहंडी धुमधडाक्यात साजरी झाल्यानंतर आता नवरात्रोत्सवातही उत्साहाचे रंग भरण्याचे नियोजन सुरू आहे.यंदा गरब्यालाही परवानगी मिळणार असून लवकरच सरकारतर्फे यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही नऊ दिवस रास दांडियाला रात्री १२पर्यंत परवानगी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.शिंदे-फडणवीस सरकार याबाबत काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.आमदारांकडूनच ही मागणी होऊ लागली असली तरी रात्री उशिरापर्यंत असे कार्यक्रम करण्यामध्ये नियमांचा अडसर होऊ शकतो.गेली दोन वर्षे राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सवासह सर्वच उत्सव नियमांच्या चौकटीत साजरा करावे लागले होते.यंदा करोनाचा संसर्ग कमी झालेला असल्यामुळे गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली होती.आगामी नवरात्रोत्सवात दरवर्षी गरब्यासाठी गर्दी होते. यंदा राज्य सरकारने मध्यरात्रीपर्यंत खुल्या जागेत रास दांडिया खेळण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही नवरात्रोत्सवाचे सर्व नऊ दिवस रात्री १२ पर्यंत गरबा खेळण्यास परवानगी द्यावी असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे.यावर्षी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव साजरा होत आहे.सदरील नऊ दिवस राज्यभरात अनेक ठिकाणी रास दांडियाचे आयोजन करण्यात येते.गुजरात राजस्थान आणि इतर काही राज्यांत दांडियासाठी नऊ दिवस रात्री १२ पर्यंत परवानगी दिली जाते. महाराष्ट्रातही अशीच परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार सुर्वे यांनी केली आहे.मुख्यमंत्री लवकरच या संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर करतील, असे सुर्वे यांनी सांगितले आहे.
पण या परवानगीमध्ये नियमांचा अडसर आहे.उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार वर्षातील १५ दिवसच खुल्या जागेत-मैदानांवर रात्री १२ पर्यंत कार्यक्रम आयोजित करता येतात.सदरील दिवस ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून जिल्हाधिकाऱ्यांना आहे.त्यानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच परिपत्रक काढून वर्षातील १५ पैकी १३ दिवस रात्री १२ पर्यंत कोणत्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.दहीहंडी उत्सव मंडळांनाही रात्री १२ पर्यंत उत्सव आयोजनाची परवानगी देण्यात आलेली नव्हती.गणेशोत्सव मंडळांनीही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रात्री १२ पर्यंतच्या परवानगीचा एक दिवस वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यांनाही नकार देण्यात आला होता.उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयानेही अशाच पद्धतीचे परिपत्रक यापूर्वीच काढले आहे.त्यामुळे सध्या तरी नवरात्र उत्सवासाठी दोन दिवसच रात्री १२ पर्यंत कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.याबाबतची कल्पना पर्यावरण विभाग,मुंबई पोलिस आयुक्त,महापालिका आयुक्त अशा संबंधित विभागांना देण्यात आली आहे.रात्री १२ पर्यंत खुल्या जागेत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वर्षातील १५ दिवसच परवानगी आहे.चालू वर्षात गणेशोत्सवासाठी चार दिवस,शिवजयंती,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन,ईद ए मिलाद,दिवाळीतील लक्ष्मीपूजन,ख्रिसमस,३१ डिसेंबर आणि नवरात्रोत्सवातील अष्टमी व नवमी हे दिवस यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहेत.शिल्लक दोन दिवसांपैकी एक दिवस हा पोलिसांच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी राखीव ठेवण्यात येतो.त्यामुळे शिलकीतील एक दिवसच नियमाप्रमाणे नवरात्रीसाठी वाढीव देता येऊ शकतो.तसे झाल्यास यंदा नवरात्रोत्सवाला एक दिवस वाढवून मिळाल्यास दोन ऐवजी तीन दिवस गरबा खेळण्यास मिळतील.याबाबत पुढील निर्णय काय होतो याकडे जनतेच्या नजर लागून आहे.