“धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष” -“दिक्षाभूमी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश
संकलन-राजेंद्र व्ही.आढाळे
पोलीस नायक,कार्यकारी संपादक
“धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष”
“धम्मचक्र प्रवर्तन दिन” हा संपूर्ण भारतभरात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे.बौद्ध धर्मियांद्वारे हा सण दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी नागपूर येथे साजरा करण्यात येतो.महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूर येथे येऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतात परिणामी या उत्सवाची पार्श्वभूमी म्हणजे हा एक धर्मांतरण सोहळाच होय.१४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला तेव्हापासून हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा करण्यात येतो यावर्षी आज १४ ऑक्टोबर शनिवार रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जात आहे.
अशोक विजयादशमी “धम्मचक्र प्रवर्तन दिन” इतिहास?
इ.स.पू.तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती तो दिवस बौद्ध इतिहासात “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जातो.सम्राट अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व तद्नुसार १४ ऑक्टोबर इ.स.१९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या पाच लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला म्हणूनच ही धम्मभूमी दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते.
आज नागपुरात लाखोंच्या संख्येने नतमस्तक होतो जनसागर
धम्मचक्र प्रवर्तन दिन
अशोक विजयादशमी “धम्मचक्र प्रवर्तन दिन” पार्श्वभूमी
इ.स.पू.तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती तो दिवस बौद्ध इतिहासात “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जातो.सम्राट अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.
विविध ठिकाणी साजरीकरण
दीक्षाभूमी,नागपूर
ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो.दरम्यान देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात तसेच देश विदेशांतील बौद्ध भिक्खू,उपासक व अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा उत्सवात सहभागी होतात.२ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात.दरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत.दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस,बुद्धभूमी,नागलोक,चिचोलीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणे समाविष्ट होतात.धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात.सन २०१८ मध्ये ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२ हजार तर सन २०१९ मध्ये ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.
दीक्षाभूमी,चंद्रपूर
चंद्रपूर येथील दीक्षाभूमी हे सुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण आहे.नागपूर येथे धर्मांतर केलेल्या १६ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी चंद्रपूर येथेही धर्मांतर सोहळा घडवून आणला यात सुमारे २ ते ३ लाख लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता त्यामुळे दरवर्षी येथेही धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो परिणामी येथेही देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध लोक सहभागी होतात.
औरंगाबाद
औरंगाबाद शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळ असलेल्या औरंगाबाद लेणी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.येथे शहरासह औरंगाबाद जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात.धम्म ध्वजारोहण,अन्नदान,रक्तदान,समुपदेशन, पुस्तक प्रदर्शन यासारखे विविध उपक्रम यानिमित्ताने राबवले जातात.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध लेणी परिसरात विविध कार्यक्रम सुद्धा घेण्यात येतात.सकाळी धम्म ध्वजारोहण कार्यक्रम व त्यानंतर भिक्खुंच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ आणि दुपारी भोजनदान करण्यात येते. यावेळी देश-विदेशातील भिक्खू संघ धम्म प्रवचन देतात व २२ प्रतिज्ञांचे पठण घेतात तसेच इच्छुक उपासकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात येते. शहरातील लोकप्रतिनिधी व अधिकारी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती राहतात.यानिमित्ताने बुद्धभीम गीतांचे कार्यक्रम,रक्तदान शिबिर राबवण्यात येतात.दिवसभरात लाखो धम्म उपासक-उपासिकांची अभिवादनासाठी गर्दी होते.’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, नमो बुद्धाय,आणि ‘जय भीम’चा जयघोष केला जातो.धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विद्यापीठ आणि बौद्ध लेणी परिसरात पुस्तकांचे अनेक स्टॉल थाटण्यात येतात.
अकोला
सन १९८७ पासून अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर अविरतपणे सुरू आहे.या सोहळ्याचे नेतृत्व दरवर्षी प्रकाश आंबेडकर हे करत असतात.या दिवशी विशाल मिरवणूक,आखाडे,लेझीम पथके,आकर्षक देखावे,विविध झाक्या,हजारों बौद्धांचा सहभाग,भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन आणि जाहीर सभा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी ६३ वा धम्म मेळावा आयोजित केला गेला होता.नागपूरच्या धम्म सोहळ्याचा कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी बुलढाणा,वाशीम व मराठवाडा भागात परत जातांना अकोला रेल्वे स्टेशनवर मुक्कामी राहून याठिकाणी भेट देतात.आता मागील १० वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.