Just another WordPress site

चितोडा येथे यावल महाविद्यालयाचे हिवाळी श्रम संस्कार शिबीर संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबीर तालुक्यातील दत्तक गाव चितोडा येथे नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदरील शिबिराचे उद्घाटन प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी सैनिक प्रभाकर झोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्ताने आयोजित सकाळच्या सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले.यावेळी माजी सैनिक प्रभाकर झोपे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाज‌सेवा केली पाहिजे.व्यावहारिक जीवनात कौशल्य युक्त शिक्षण अंगिकारणे महत्त्वाचे असून त्यातून समाजाची,गावाची व देशाची प्रगती होत जाते असे सांगितले.ग्रामसेवक पी.व्ही.तळेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.तर माजी सरपंच कडू पाटील,यावल तालुका अध्यक्ष साहिल तडवी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वतःला सिध्द करण्यासाठी झोकून दिले पाहिजे त्यासाठी शिस्त,शांतता,नम्रता हे गुण अंगिकारणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.प्रसंगी सकाळच्या सत्रात श्रमदान करतांना कर्मचारी,विद्यार्थ्यांनी मतदार दिनानिमित्त शपथ घेतली व ई.व्ही.एम.मतदान मशिन बाबतीत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिका सह निलेश पाचलोखे व हेमा सांगोळे तलाठी अट्रावल यांनी मार्गदर्शन केले.

दुपारच्या बौद्धिक क्षेत्रात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकास करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी अंतर्मन व बाह्यमन,आवडी निवडीच्या गोष्टी,हौशी मौजेच्या वस्तू,मोबाईल,टी.व्ही ह्यात जास्त वेळ घालू नये,मनावर ताबा ठेवावा,चिंतन,मनन,योगा तसेच स्थिर मन असणे आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी व्यक्तिमत्व विकासाच्या बारा पैलुंचे महत्त्व उघडून दाखवले.चांगले श्रोते,विनोदी बुद्धी,ज्येष्ठ व्यक्ती विषयी आदर,स्वतःच्या शारीरिक रचनेत बदल,आत्मपरीक्षण,चांगले निर्णय,कलागुणांचे प्रदर्शन,सकारात्मक ऊर्जा,उच्च विचार सरणी,ऐतिहासिक गोष्टींचा छंद,नेटकेपणा,समाज सुचकता,व्यवहारिक ज्ञान,अंगी जोपासणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.सदर कार्यक्रमाला पंकज वारके पोलीस पाटील चितोडा,श्रीमती कुंदा गाजरे मुख्याध्यापिका,अर्चना कोल्हे प्राथमिक शिक्षिका व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आर. डी.पवार यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली कोष्टी यांनी केले तर आभार प्रा.सुभाष कामडी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.