पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ एप्रिल २४ सोमवार
मराठी नव वर्ष आणि साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढी पाडवा परिणामी या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे मुख दर्शन दिवसभर घेता येणार आहे.सध्या विठ्ठल मंदिराचे संवर्धनाचे काम सुरु असल्याने देवाचे पायावर डोके ठेवून दर्शन बंद आहे मात्र भाविकांसाठी सकाळी मुख दर्शनाची सोय करण्यात आली आहे.पाडव्याच्या दिवशी म्हणजे उद्या दि.९ एप्रिल मंगळवार रोजी पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत मुख दर्शन भाविकांना घेता येईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक आतुरलेला असतो मात्र सध्या श्री विठ्ठल मंदिराचे संवर्धनाचे काम सुरु आहे त्यामुळे सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मुख दर्शन म्हणजे लांबून दर्शन घेता येत आहे.हे दर्शन पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत भाविकांना घेता येणार आहे मात्र दि ९ एप्रिल रोजी गुढी पाडवा आहे.या दिवशी राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात ही बाब ध्यानात घेवून मंदिर समितीने देवाच्या मुख दर्शनाच्या वेळेत फक्त एक दिवस म्हणजेच पाडव्याची दिवशी वाढ केल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली आहे.गुढी पाडवा या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मुख दर्शन पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना घेता येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच वारकरी संप्रदायातील महत्वाची मानली जाणारी चैत्री वारी कालावधीत देखील देवाचे मुख दर्शन घेता येणार आहे.दि १५ ते २१ एप्रिल दरम्यान भाविकांना देवाचे मुख दर्शन पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत घेता येणार आहे.सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे त्यामुळे यात्रा कालावधीत भाविकांना दर्शन रांगेत स्पिंकरल,कुलर,थंड पिण्याचे पाणी,सरबत,मठ्ठा वाटप करण्यात येणार आहे.याशिवाय पत्राशेड व दर्शनमंडप येथे आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष,उपजिल्हा रूग्णालया मार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे.मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्ययावत रूग्णवाहिका ठेवण्यात येत आहेत.गर्भगृहाचे काम सुरू असल्याने पदस्पर्श दर्शन बंद आहे त्यामुळे पदस्पर्शदर्शन सुरू होईपर्यंत भाविकांच्या हस्ते पुजा बंद करण्यात आलेल्या आहेत.नजीकच्या काळात होणारी चंदनउटी पुजा देखील मंदिर समिती मार्फत करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले असे असले तरी मराठी नव वर्षा निमित्त भाविकांना सावळ्या विठुरायाचे लांबून का होईना दर्शन घेवून नव वर्षाचा संकल्प सोडता येणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.