अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ एप्रिल २४ मंगळवार
अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत.अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत.त्यातच २३ आणि २४ एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडूंना उमेदवार दिनेश बुब यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती मात्र त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना नियमानुसार दिलेली परवानगी सुरक्षेचे कारण देऊन रद्द करण्यात आली आहे आणि त्यानंतर या मैदानावर आता अमित शाह यांची सभा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य आमनेसामने आले आहेत.अमित शाह यांची उद्या सभा होणार असल्यामुळे याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
आज बच्चू कडू त्यांच्या सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसह येथे आले असतांना त्यांना पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला.आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी असतानाही आमची अडवणूक का करत आहात ? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.तसेच पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडू पोलिसांवरच संतापले.पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमची समजूत का घालत आहेत? अमित शाह यांच्या सभेसाठी जर परवानगी मिळाली असेल तर त्यांनी ती दाखवावी अन्यथा ज्यांना परवानगी मिळाली आहे त्यांना सभा घेऊ द्यावी असे बच्चू कडू म्हणाले मात्र पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना मैदानात येऊ दिले नाही.पोलीस आपले ऐकत नाहीत हे पाहिल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाने दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांसमोरच फाडून टाकले. पोलिसांनी आपल्या गळ्यात भाजपाचा पट्टा घालावा आणि गाडीवर भाजपाचे झेंडे लावावेत अशीही टीका बच्चू कडू यांनी केली आहे.भाजपाच्या सांगण्यावरून पोलीस काम करत असून आम्हाला मैदानाबाहेर काढले जात आहे असाही आरोप बच्चू कडू यांनी केला. अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानावर २१ आणि २२ एप्रिल रोजी नवनीत राणा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती तर बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी परवानगी मिळाली होती त्यासाठी रितसर पैसेही भरण्यात आले होते मात्र अमित शाह यांचा दौरा २४ एप्रिल रोजी ठरल्यामुळे पोलिसांनी बच्चू कडू यांना मैदानावर येऊ दिले नाही.
अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर होत असतांना बच्चू कडू आणि महायुतीमधील संघर्ष विकोपाला गेला.भाजपाने नवनीत राणा यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनीही प्रहार जनशक्तीतर्फे दिनेश बुब यांना मैदानात उतरविले तर महाविकास आघाडीतर्फे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.भाजपाने अमरावतीमध्ये विजय मिळवण्यासाठी कंबर कसली असून अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा येथे झालेल्या आहेत.आता मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी म्हणजेच २४ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही सभा होणार आहे त्यावरून बच्चू कडू आणि रवी राणा आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहे.अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानात प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी सभा घेण्यास निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली होती मात्र २४ एप्रिल रोजी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह याच मैदानावर प्रचार सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना आज मैदानाचा ताबा घेण्यासापासून पोलिसांनी मज्जाव केला.आपल्याकडे रितसर परवानगी असूनही पोलीस आपली अडवणूक करत असल्याचा आरोप करून बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन करत पोलीस भाजपाधार्जिण निर्णय घेत असल्याचा आरोप केला.
बच्चू कडू यांच्या आक्रमक भूमिकेनंतर स्वाभिमानी युवा पक्षाचे नेते आणि नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी टीका केली आहे.टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत असतांना रवी राणा म्हणाले,बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्यासाठी नौटंकी करत आहेत.या नौटंकीबाजाला महाराष्ट्राची जनता चांगली ओळखून आहे.देशाचे गृहमंत्री अमित शाह हे अमरावतीमध्ये येत आहेत.अमित शाह यांनी अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याकांड उघड करण्यासाठी प्रयत्न केले होते तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन मंत्री बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांनी हे हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न केला होता.उमेश कोल्हे यांच्या प्रकरणाला घरोफोडीच्या प्रकरणात बदलण्यात आले होते मात्र अमित शाह यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणात न्याय मिळाला त्या अमित शाह यांना बच्चू कडू विरोध करत आहेत हे दुर्दैवी आहे असे रवी राणा यांनी म्हटले आहे.महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होत असतील तर निवडणूक आयोगाकडून त्या त्या वेळी निर्णय घेतले जात असतात.उद्या अचलपूर येथे आमची सभा होती मात्र तिथे राहुल गांधी येणार असल्यामुळे माझी सभा रद्द करण्यात आली.काल सांस्कृतिक भवन आमच्या नावाने घेण्यात आले होते मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे येणार असल्यामुळे ऐनवेळी आम्हाला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली.मोठे नेते येणार असतील तर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही बदल केले जात असतात.प्रशासन त्याचा निर्णय घेत असते.बच्चू कडू यांनी परवानगी मागण्याआधीच आम्ही २१ ते २४ एप्रिल या तारखांमध्ये आमची सभा होऊ शकते असे निवडणूक आयोगाला कळविले असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.