Just another WordPress site

बालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करण्याबाबत राकेश सोनार यांचे महिला व बालविकास मंत्र्यांना निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ जुलै २६ शनिवार

जळगाव जिल्ह्यातील ‘बालसंगोपन योजना’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरीत करण्यात यावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात यावेत या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभाचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना जळगाव येथे प्रत्यक्ष भेटून नुकतेच देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ,निराधार आणि गरजू बालकांच्या संगोपनासाठी ‘बालसंगोपन योजना’ राबवली जाते व ही योजना बालकांसाठी अत्यंत दिलासादायक असली तरी जळगाव जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा नियमित लाभ मिळालेला नाही अशी गंभीर बाब राकेश सोनार यांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.लाभ वेळेवर न मिळाल्यामुळे या चिमुकल्यांचे शिक्षण,आरोग्य आणि संगोपनावर अत्यंत विपरीत परिणाम होत आहे तसेच हातावर पोट असलेल्या गरजू पालकांना व नातेवाईकांना लाभाच्या आशेने शासकीय कार्यालयांचे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्ह्यातील अनेक पात्र आणि गरजू बालके आपल्या हक्काच्या लाभापासून वंचित राहत आहेत असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
सदर निवेदनात प्रामुख्याने पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला असून त्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.यात जळगाव जिल्ह्यातील बालसंगोपन योजनेचा मागील ३ वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरित करण्यात यावा.पात्र लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे लाभ मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेला सख्त सूचना देण्यात याव्यात.लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांत होणारा नाहक त्रास थांबवून ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात यावी अशा आहेत.सदरहू या गंभीर प्रश्नात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने लक्ष घालून जळगाव जिल्ह्यातील पात्र बालकांना व त्यांच्या पालकांना न्याय मिळवून द्यावा अशी ठाम मागणी राकेश सोनार यांनी केली आहे.मंत्री महोदयांनी या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांना दिले असल्याचे राकेश सोनार यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.