यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ जून २४ मंगळवार
‘तालुका जिथे क्रिडा संकुल तिथे’ या राज्य सरकारच्या धोरणानुसार यावल तालुक्यात अनेक वर्षापासुन क्रिडा संकुलाची कामे सुरु करण्यात आलेली नसून आजपावेतो प्रशासनाला जागाच उपलब्ध होऊ शकलेली नाही का ? असा सवाल तालुकावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.परिणामी प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे ‘शासनाचे काम आणि दहा वर्षे थांब’ असे म्हणण्याची वेळ तालुकावासीयांवर येऊन ठेपली आहे.याबाबत मनसेतर्फे वेळोवेळी निवेदन देण्यात आले असून यावर अद्यापि कुठलीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.याबाबत जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील व स्वर्गीय हरीभाऊ जावळे यांनी पाहणी करून सुध्दा काम झाले नाही.निधी मंजुर आहे मग पुढे तालुका क्रिडा संकुलाचे काम झाले नाही ? असा प्रश्न तालुकावासीयांना पडला आहे.राज्यात राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा सुविधा व्हाव्यात यासाठी त्रिस्तरिय क्रिडा संकुलनाची उभारणी करण्याचे धोरण राज्य सरकारचे असून यावल तालुकास्तरीय क्रिडा संकूलाचा समावेश आहे. तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील होतकरू मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देश्यातून मागणी केली जात आहे मात्र शहरी जिल्हास्तरावरील किडा संकुल मार्गा लागले असून तालुका पातळीवरील क्रिडा संकुल मात्र रखडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
क्रिडा संकुल बांधण्यासाठी तालुक्यात जागा उपलब्ध असून बांधकामासाठी ३ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी देखील मंजुर प्राप्त आहे.दरम्यान आता पर्यंतचे चित्र बघता तालुक्यात क्रिडा संकुलाचे काम मार्गी लागेल कि नाही ? याबाबत संशय वाटत आहे.तालुक्याच्या क्रिडा संकुलाचे काम अद्यापपर्यत रखडलेल्या अवस्थेत असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही वेळोवेळी या विषयाचा पाठपुरावा केलेला आहे.दरम्यान खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची केन्द्र शासनाच्या मंत्रीमंडळात क्रिडामंत्री झाल्या असून आपल्याकडुन शासनस्तरावर यावल तालुक्यातील क्रिडा संकुलाचा अनेक दिवसापासुन प्रलंबीत विषय मार्गी लागेल अशी अपेक्षा केन्द्रीय मंत्री ना .रक्षाताई खडसे यांना दिलेल्या निवेदनाव्दारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर,तालुका अध्यक्ष मुकेश बोरसे,यावल तालुका उपाध्यक्ष शाम पवार,किशोर नन्नवरे,गौरव कोळी आदी पक्षाच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.